धुळे

Dhule News | धुळ्याच्या शुभम बेहरेंचे सलग दुसर्‍यांदा यूपीएससी परीक्षेत यश

ग्रामीण तरुणांसाठी प्रेरणास्रोत, खान्देशातील एकमेवव्दितीय यशाबद्दल सर्वस्तरातून कौतुक

पुढारी वृत्तसेवा

धुळे : जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या प्रतिष्ठानावर, यशाचे कोणतेही अत्युच्च शिखर गाठता येते हे शुभम शरद बेहरे यांनी सिध्द केलेयं. जी परीक्षा उत्तीर्ण होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी देशातील लाखों तरुण वर्षानुवर्ष श्रम घेतात, त्याच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत(यूपीएससी) शुभम शरद बेहरे यांनी सलग दुसर्‍यांदा यश मिळविले आहे. दरम्यान यापूर्वी २०२३ मध्ये ३९७ वी रॅंक मिळवित शुभम बेहरे यांनी पहिल्याच प्रयत्नात यश मिळविले आहे. तेव्हा त्यांची निवड आयआरएस (Income Tax) सेवेसाठी झाली होती. सध्या ते नागपूर येथील नॅशनल ॲकॅडमी ऑफ डायरेक्ट टॅक्सेसमध्ये प्रशिक्षण घेत आहेत.

मात्र, इथेच थांबून न राहता त्यांनी पुन्हा एकदा प्रयत्न करत २०२५ मध्ये झालेल्या याच केंद्रिय लोकसेवा आयोगाच्या सीएसई परीक्षेत तब्बल २२६ वी रैंक मिळवत स्वतःची गुणवत्ता आणखी सिद्ध केली. सलग दोनदा यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्याचे खान्देशातील एकमेवव्दितीय उदाहरण असल्याचे बोलले जात आहे. त्यांचे हे यश ग्रामीण तरुणांसाठी प्रेरणास्रोत ठरत आहे. त्यांच्या या खान्देशातील एकमेवव्दितीय यशाबद्दल सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

शुभम शरद बेहरे यांचे प्राथमिक शिक्षण धुळे येथील जयहिंद मराठी शाळेत, तर माध्यमिक शिक्षण जयहिंद हायस्कूल येथे झाले. शालेय जीवनापासूनच शुभम अत्यंत अभ्यासू, जिज्ञासू आणि मेहनती विद्यार्थी होते. उच्च ध्येय ठेवत त्यांनी शालेय शिक्षणानंतर देशातील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या आयआयटी बॉम्बे या देशातील अग्रगण्य तंत्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेतला. या संस्थेतून बीटेक ही पदवी प्राप्त केली. दरम्यान आयआयटी मुंबईत बीटेक च्या शेवटच्या वर्षात असतांनाच कॅम्पस इंटव्ह्यूच्या माध्यमातून शुभम बेहरे यांनी, रिलाइन्स ग्रुप जॉईन करून २० महिने बडोदा येथे उच्च पगारावर नोकरी केली. आयआयटी सारख्या संस्थेत शिक्षण घेत असतानाच प्रशासनात काम करून समाजासाठी काहीतरी करण्याचे स्वप्न शुभम बेहरेंनी पाहिले आणि त्यासाठी केंद्रिय लोकसेवा आयोग या कठीण स्पर्धेचा मार्ग निवडला व त्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. त्याच्या या अथक परिश्रमांचे फळ म्हणजे २०२३ च्या परीक्षेत ३९७ वी रैंक मिळवत त्यांनी यूपीएससी त यश मिळवले.

या यशावर त्यांची निवड आयआरएस (Income Tax) सेवेसाठी झाली. सध्या ते नागपूर येथील नॅशनल ॲकॅडमी ऑफ डायरेक्ट टॅक्सेसमध्ये प्रशिक्षण घेत आहेत. मात्र, या यशानेही शुभम यांना स्वस्थ बसू दिले नाही. या यशानंतरही थांबून न राहता त्यांनी पुन्हा एकदा प्रयत्न करत २०२५ मध्ये याच केंद्रिय लोकसेवा आयोगाच्या सीएसई परीक्षेत तब्बल २२६ वी रैंक मिळवत स्वतःची गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध केली.

शुभम शरद बेहरे यांनी जिद्द, चिकाटी व मेहनत यातून हे यश संपादन केले. या यशामागे त्यांच्या कुटुंबाचेही मोठे योगदान राहीले. शुभम यांचे वडील शरद भास्कर बेहेरे हे मोराणे प्र.नेर येथील श्री. छत्रपती शिवाजी सैनिकी विद्यालयात प्राचार्य पदावर कार्यरत आहेत. तर आई विजया शरद बेहेरे या त्याच विद्यालयात शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. कुटुंबातून मिळालेली शिक्षणाची संस्कारमूल्ये आणि शिस्तबद्ध वातावरण यामुळे शुभमच्या दमदार यशाची भक्कम पायाभरणी शालेय शिक्षणातच झाली. या तरुणाने कठोर परिश्रम, जिद्द आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर यश मिळवले. धुळे जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करणारा हा तरुण विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्त्रोत ठरत आहे. अशा पध्दतीने यूपीएससी परीक्षेत यश मिळविणारे शुभम बेहरे खान्देशातील एकमेवव्दितीय असुन, त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT