Shirpur Rupsingpada cannabis seized
धुळे: शिरपूर तालुक्यातील रूपसिंगपाडा येथील एका शेतातून सोळा लाख रुपये किमतीचा गांजाचा साठा पोलिसांनी जप्त केला आहे. या संदर्भात शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी ही कारवाई केली.
शिरपूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे यांना गुप्त बातमीदारामार्फत अमली पदार्थाच्या तस्करीची माहिती मिळाली. प्राथमिक माहिती मिळाली की, शिरपूर तालुक्यातील आंबे शिवारातील रूपसिंगपाडा येथे राहणारा रुपसिंग दुर्गा पावरा याने तो राहत असलेल्या घराच्या पाठीमागील शेतात प्रतिबंधित गांजा अमली पदार्थ (सुका गांजा) लपवून ठेवला आहे. त्यावरुन पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी ही माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना फोनने देवून छापा कारवाई कामी परवानगी घेतली.
त्यानंतर रुपसिंगपाडा गावाच्या शिवारात रुपसिंग दुर्गा पावरा त्याच्या घराच्या पाठीमागील शेतामध्ये पथक पोहचले. या ठिकाणी शेताची पंचासमक्ष झडती घेतली असता त्याठिकाणी उसाचे पिकाचे लागवड केलेल्या क्षेत्रात एक पत्र्याची कोठी व चार निळया रंगाचे प्लॉस्टिकचे ड्रम आढळून आले. त्याची पाहणी केली असता त्यात गांजा अंमली पदार्थ मिळुन आला.
घटनास्थळावरून 9 लाख 5 हजार 940 रुपये किंमतीचा एकूण 129.420 किलोग्रॅम वजनाचा गांजा तसेच 7 लाख रुपये किंमतीचा एकूण 100 किलोग्रॅम वजनाचा गांजा अमली पदार्थ हा वेगवेगळया प्लास्टीकच्या गोण्यांमध्ये प्रत्येकी 25 किलोग्रॅम प्रमाणे भरलेला आढळून आला.पथकाने एकूण 16 लाख 5 हजार 940 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.