आरोपींकडून सुमारे ५ लाख २३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. Pudhari
धुळे

Dhule ATM Fraud | एटीएम कार्डची अदलाबदल करून फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील चौघे जेरबंद; ५ लाखांचा मुद्देमाल जप्त

पिंपळगाव बसवंत परिसरातील दोन आणि शिरपूर तालुक्यातील दोन असे एकूण चार गुन्हे केल्याचे उघड

पुढारी वृत्तसेवा

Shirpur ATM Card Swapping Case

धुळे : एटीएम केंद्रात ग्राहकांचे लक्ष विचलित करून त्यांच्या एटीएम कार्डची हातचलाखीने अदलाबदल करत आर्थिक फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील चौघांना शिरपूर शहर पोलिसांनी अटक केली आहे. प्राथमिक तपासात या टोळीने पिंपळगाव बसवंत परिसरातील दोन आणि शिरपूर तालुक्यातील दोन असे एकूण चार गुन्हे केल्याचे उघड झाले असून, आरोपींकडून सुमारे ५ लाख २३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

शिरपूर शहरातील पित्रेश्वर कॉलनी येथील रहिवासी दीपक अमृत चौधरी हे पैसे काढण्यासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या एटीएम केंद्रात गेले असता, तेथे उपस्थित तीन अनोळखी व्यक्तींनी त्यांना "मशीनमध्ये पैसे आहेत का?" अशी विचारणा करत बोलण्यात गुंतवून ठेवले. त्याचवेळी एका आरोपीने हातचलाखीने त्यांचे एटीएम कार्ड बदलले आणि त्यानंतर खात्यातून १७ हजार ३०० रुपये काढून फसवणूक केली. याप्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३१८(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने यापूर्वीच्या अशाच प्रकारच्या गुन्ह्यांचा अभ्यास केला. घटनास्थळासह शिरपूर शहर आणि लगतच्या महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली. संशयित पांढऱ्या रंगाच्या कारचा माग काढत धुळेसह शेजारील जिल्ह्यांतील टोल नाक्यांची माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू ठेवण्यात आला.

तपासादरम्यान गुन्ह्यात वापरण्यात आलेली कार चांदवड येथील स्वामी प्राईड हॉटेलसमोर उभी असल्याचे आढळून आले. पोलिसांनी हॉटेल व्यवस्थापनाकडून माहिती घेत सापळा रचला. संशयित हॉटेलमधून बाहेर येताच त्यांना ताब्यात घेण्यात आले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अलीम रमजान मेव, समुन रमजान मेव, नासिर दिनू मेव (तिघेही रा. घागोट, ता. व जि. पलवल, हरियाणा) तसेच सलमान फजरुद्दीन मेव (रा. चिड्डूर, ता. व जि. बुलंदशहर, उत्तर प्रदेश) यांचा समावेश आहे. चौकशीदरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली.

प्राथमिक तपासात आरोपी एटीएम केंद्रात विशेषतः वयोवृद्ध ग्राहकांना लक्ष्य करत असल्याचे समोर आले. ग्राहकांना बोलण्यात गुंतवून त्यांच्या एटीएम कार्डची अदलाबदल केली जात असे. त्यानंतर कार्डचा गैरवापर करून त्यांच्या खात्यातून पैसे काढले जात होते.

पोलिसांच्या पुढील तपासात या टोळीने पिंपळगाव बसवंत परिसरातील दोन आणि शिरपूर तालुक्यातील दोन अशा एकूण चार एटीएम फसवणुकीचे गुन्हे केल्याचे उघड झाले असून, या टोळीचा इतर जिल्ह्यांतील गुन्ह्यांशी संबंध आहे का, याचाही तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT