पत्रकार परिषदेत लोकप्रतिनिधींनी प्रशासनाचे लक्ष वेधत मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. Pudhari
धुळे

Shindkheda Nagar Panchayat | कामे अपूर्ण, पैसे मात्र पूर्ण; शिंदखेड्यात ठेकेदारांविरोधात कारवाईची मागणी

प्रभाग क्रमांक १२, १५ आणि १७ मधील मंजूर विकासकामे अद्याप अपूर्ण असून काही कामांचा दर्जाही निकृष्ट

पुढारी वृत्तसेवा

Shindkheda Action Against Contractors

सोनगीर (धुळे) : शिंदखेडा नगरपंचायतीअंतर्गत विविध विकासकामे अपूर्ण व निकृष्ट दर्जाची झाल्याचा आरोप करत नगराध्यक्षा कलावतीताई माळी तसेच नगरसेवकांनी ठेकेदारांविरोधात कारवाईची मागणी केली आहे. यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत लोकप्रतिनिधींनी प्रशासनाचे लक्ष वेधत मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.

नगराध्यक्षा कलावतीताई माळी यांनी सांगितले की, प्रभाग क्रमांक १२, १५ आणि १७ मधील मंजूर विकासकामे अद्याप अपूर्ण असून काही कामांचा दर्जाही निकृष्ट असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. राम कॉन्ट्रॅक्शन्स, अवंतिका कॉन्ट्रॅक्शन्स आणि रेडियन्स इलेक्ट्रिकल्स या ठेकेदारांविरोधात नगरपंचायत प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली आहे.

प्रभाग क्रमांक १५ आणि १७ मधील कम्युनिटी हॉलचे काम अद्याप सुरू झालेले नाही. तसेच भगवा चौक ते एसएसव्हीपीएस कॉलेजपर्यंतचा जॉगिंग ट्रॅक अपूर्ण आहे. बी. के. देसले नगरातील भुयारी गटारीचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा आरोप करण्यात आला. सोलार लाईट प्रकल्पाचे कामही समाधानकारक नसल्याचे सांगण्यात आले.

ठेकेदारांनी प्रत्यक्ष काम न करता लाभार्थी ठेकेदारांमार्फत कामे केल्याचाही आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. अवंतिका कॉन्ट्रॅक्शन्समार्फत सिद्धार्थ नगरमध्ये पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम कार्यादेशानुसार सुरू होणे अपेक्षित होते, मात्र अद्याप कामाला सुरुवात झालेली नाही. तरीही संबंधित कामाचे पैसे काढण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

निवेदनात संबंधित ठेकेदारांना नव्या कामांसाठी परवानगी देऊ नये, त्यांना काळ्या यादीत टाकावे तसेच मंजूर कामांसाठी नवीन ठेकेदारांची नियुक्ती करून दर्जेदार कामे पूर्ण करून घ्यावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, नगरपंचायतीने याबाबत तातडीने कारवाई न केल्यास नागरिकांच्या रोषाला प्रशासनालाच सामोरे जावे लागेल, असा इशाराही लोकप्रतिनिधींनी दिला आहे. शहराच्या विकासाशी संबंधित हे प्रकरण असल्याने प्रशासन पुढे काय भूमिका घेते आणि संबंधित ठेकेदार यावर काय प्रतिक्रिया देतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT