devendra fadanvis  x
धुळे

Dhule News : धुळ्याचा कायापालट होणार! विमानतळाचा विस्तार आणि ‘इंडस्ट्रियल हब’साठी हालचाली; मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा

पुढारी वृत्तसेवा

धुळे : दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात धुळे जिल्ह्याचा समावेश करून येथे मोठ्या प्रमाणावर औद्योगीकरण केले जाईल. या विकासाला गती देण्यासाठी धुळे विमानतळाच्या विस्तारीकरणाचे काम तातडीने हाती घेण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. धुळे शहरात आयोजित ‘कमळ विजय संपर्क संकल्प’ अभियानांतर्गत आयोजित सभेत ते बोलत होते.

विमानतळ विस्तार आणि उद्योगांची भरभराट

मुख्यमंत्री म्हणाले की, ‘कोणत्याही भागाच्या औद्योगिक विकासासाठी हवाई वाहतूक अत्यंत आवश्यक असते. त्यामुळे धुळे विमानतळाचा विस्तार करून तेथून नियमित विमान वाहतूक सुरू करण्यावर आमचा भर आहे. एकदा विमानसेवा सुरू झाली की, मोठ्या उद्योगांचा ओघ धुळ्याकडे वाढेल आणि स्थानिकांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील.’

शहरांच्या विकासासाठी ५० हजार कोटींचा निधी

काँग्रेसवर टीका करताना मुख्यमंत्री म्हणाले की, ‘गेल्या ७० वर्षांत शहरांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे बकालपणा वाढला. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहरांचा चेहरामोहरा बदलण्यासाठी अमृत योजना, स्मार्ट सिटी आणि स्वच्छ भारत यांसारख्या योजनांच्या माध्यमातून ५० हजार कोटींहून अधिक निधी दिला आहे. धुळ्यासाठी देखील ७१७ कोटींची भुयारी गटार योजना मंजूर केली असून, आता सांडपाण्यावर प्रक्रिया करूनच ते नदीत सोडले जाईल, ज्यामुळे पर्यावरणाचे रक्षण होईल.’

झोपडपट्टीवासीयांना मिळणार मालकी हक्काचे घर

धुळ्यातील बेघरांच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी दिलासादायक बातमी दिली. ‘अतिक्रमणामुळे अनेकांना घरकुलाचा लाभ मिळत नव्हता, परंतु आता झोपडपट्टीधारकांना त्यांच्या जागेचा मालकी हक्काचा दाखला दिला जाईल आणि त्याच ठिकाणी त्यांना हक्काचे पक्के घर बांधून दिले जाईल,’ असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच, 'लाडकी बहीण योजना' कोणीही बंद करू शकणार नाही, असा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केला.

बिनविरोध निवडीवरून विरोधकांचा समाचार

भाजपचे नगरसेवक बिनविरोध निवडून आल्यावर 'लोकशाहीचा खून' झाला असे म्हणणाऱ्या विरोधकांना मुख्यमंत्र्यांनी जोरदार टोला लगावला. ‘काँग्रेसच्या काळात ३३ खासदार बिनविरोध निवडून आले होते, तेव्हा लोकशाही जिवंत होती का? आता नगरसेवक बिनविरोध झाले तर विरोधकांना मिरची का लागतेय?’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

या सभेला पालकमंत्री जयकुमार रावल, गिरीश महाजन, आमदार अनुप अग्रवाल, आमदार काशीराम पावरा, आमदार राम भदाणे, माजी खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT