Sakri Pimpakner Road Bike Collision Pudhari
धुळे

Dhule Accident | साक्री-पिंपळनेर मार्गावर दुचाकींची धडक; 2 तरुण जागीच ठार, एक गंभीर

सिताडीपाडा वस्तीजवळ भीषण अपघात; गंभीर जखमीला धुळे येथे हलविले

पुढारी वृत्तसेवा

Sakri Pimpakner Road Bike Collision

पिंपळनेर : साक्री-पिंपळनेर मार्गावर सिताडीपाडा वस्ती परिसरात दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. हा अपघात शनिवारी (दि.३) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडला. या घटनेप्रकरणी साक्री पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सिताडीपाडा गावाजवळ एमएच ३९ एआर ५९३० आणि एमएच ३९ डी ६६८२ या क्रमांकाच्या दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. धडक एवढी जोरदार होती की, दोन्ही दुचाकींवरील तरुण गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी मदतकार्य करत जखमींना तातडीने साक्री ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केल्यानंतर समाधान रवींद्र पानपाटील (वय २३, रा. चाकळी, ता. जि. नंदुरबार) आणि विशाल कैलास ठाकरे (वय २६, रा. तोरणकुडी) यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर केशव फुलपगारे (रा. दातर्ती, ता. साक्री) हे गंभीर जखमी झाले आहेत. साक्री ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने वैद्यकीय अधिकारी डॉ. ललित पाटील यांनी त्यांना पुढील उपचारासाठी धुळे येथील हिरे वैद्यकीय रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घेतला.

अपघाताची माहिती मिळताच मृतांच्या नातेवाइकांसह परिचित आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी साक्री ग्रामीण रुग्णालयात गर्दी केली. तरुणांच्या मृत्यूची माहिती समजताच नातेवाइकांवर दुःखाचा डोंगर कोसळला.

या प्रकरणी साक्री पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक संतोष मुढे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT