भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रजीत पाटील यांची पत्रकार परिषद Pudhari
धुळे

Sakri Nagarpanchayat | साक्री नगरपंचायतीतील राजकीय नाट्यावर भाजपचे प्रत्युत्तर; विरोधकांच्या आरोपांचे खंडन

भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रजीत पाटील यांनी पत्रकार परिषदेत सर्व अफवा फेटाळल्या

पुढारी वृत्तसेवा

BJP vs Opposition Sakri

पिंपळनेर : साक्री नगरपंचायतीत उपनगराध्यक्ष पदाच्या कथित बनावट राजीनाम्याभोवती निर्माण झालेल्या राजकीय वादाला भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रजीत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व अफवा फेटाळून लावत विकासकामांचा आढावा सादर केला.

या पत्रकार परिषदेला नगराध्यक्ष उषा पवार, गटनेते बा. बापुसाहेब गीते, उपनगराध्यक्ष अॅड. गजेंद्र भोसले तसेच नगरसेवक प्रवीण निकुंभ, आबा सोनवणे आणि स्वप्निल भावसार उपस्थित होते.

चंद्रजीत पाटील यांनी स्पष्ट केले की, उपनगराध्यक्षांच्या बनावट राजीनाम्याबाबतच्या बातम्या पूर्णपणे खोट्या आहेत. उज्ज्वला भोसले यांचा राजीनामा ठरलेल्या नियोजनानुसारच झाला असून त्यानंतरची निवड प्रक्रिया कायदेशीर मार्गाने पार पडली. या प्रक्रियेनंतर गजेंद्र भोसले यांची पुन्हा उपनगराध्यक्षपदी निवड करण्यात आली.

यावेळी पाटील आणि बापुसाहेब गीते यांनी विरोधकांचे आरोप पुराव्यांसह खोडून काढत शहरातील विकासकामांवरही प्रकाश टाकला. साक्री शहरात प्रथमच मोठ्या प्रमाणावर सौरऊर्जेचा वापर सुरू करण्यात आला असून विविध वसाहतींमध्ये सौर पथदिवे बसविण्यात आले आहेत. बंद दिव्यांबाबत कंत्राटदाराला नोटीस देण्यात आली असून वेळेत काम न झाल्यास अनामत रक्कम जप्त करण्याचा इशाराही देण्यात आला.

शहरातील वाढती गर्दी लक्षात घेता बाजारपेठेसाठी पर्यायी जागेचा शोध सुरू असून लवकरच तो प्रश्न मार्गी लागेल, असेही सांगण्यात आले. याशिवाय कोट्यवधी रुपयांची विकासकामे सुरू असून पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव मंत्रालयात प्रलंबित असून त्यावर काम सुरू आहे. मोकाट जनावरांचा प्रश्नही लवकर सोडवण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले.

दरम्यान, वार्ड क्रमांक ३ आणि ४ मधील मोकळ्या जागेवर सुमारे एक कोटी रुपयांच्या निधीतून “नमो उद्यान” उभारण्याची योजना असून त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. योग्य ठेकेदार निश्चित झाल्यानंतर कामाला सुरुवात होईल, अशी माहिती गटनेते बापुसाहेब गीते यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT