Sakri taluka crop damage
पिंपळनेर : साक्री तालुक्यात १८ व १९ मार्च रोजी झालेल्या अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार मंजुळाताई तुळशिराम गावित यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह बाधित भागांचा दौरा करून परिस्थितीची पाहणी केली.
बेहेड, कावठे, पेरेजपूर, कासारे, मालपूर, नांदवण, भाडणे, अष्टाणे आणि विजापूर या गावांमध्ये जाऊन त्यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी संवाद साधला. या पाहणीदरम्यान प्रांताधिकारी रोहन कुवर, तहसीलदार साहेबराव सोनवणे, तालुका कृषी अधिकारी योगेश सोनवणे तसेच स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
अवकाळी पावसामुळे कांदा, गहू, हरभरा, मका, टोमॅटो आणि आंबा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हाती आलेली पिके नष्ट झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. विशेषतः गारपीटीमुळे आंबा पिकावर मोठा परिणाम झाला असून कांदा पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. गव्हाचे आणि हरभऱ्याचे पीक पूर्णपणे आडवे झाले आहे.
या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त भागांचे तातडीने व वस्तुनिष्ठ पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे निर्देश आमदार गावित यांनी प्रशासनाला दिले. तसेच शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत मिळावी यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या पाहणी दौऱ्यात विविध विभागांचे अधिकारी, स्थानिक पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.