Sakri Cattle Shed Fire
पिंपळनेर : साक्री तालुक्यातील बोदगाव येथे गुरुवारी पहाटे तीन ते चार वाजेच्या सुमारास शेतकऱ्याच्या गोठ्याला भीषण आग लागून मोठे नुकसान झाले. या आगीत शेतीची अवजारे, सागवान लाकूड आणि जनावरांसाठी साठवून ठेवलेला चारा जळून खाक झाला. या दुर्घटनेत शेतकरी रामदास लाला पवार यांचे अंदाजे ८५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
रामदास पवार यांच्या घरालगत असलेल्या गोठ्यात पहाटे अचानक आगीचा भडका उडाला. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केल्याने गोठ्यातील साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नामदेव सहारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पिंपळनेर नगरपरिषदेचा अग्निशमन बंबही दाखल झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून आगीवर नियंत्रण मिळविले.
दरम्यान, बोदगावचे महसूल अधिकारी के. एच. वाघ यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. तसेच पंचनामा केला.
आधीच दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्याला या आगीमुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे. जनावरांचा चारा जळाल्याने पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. त्यामुळे शासनाने शेतकरी रामदास पवार यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी काँग्रेस सदस्या संगीता गणेश गावित यांनी केली आहे.