धुळे

धुळे | लाटीपाडा प्रकल्पातील आरक्षीत पाणी सोडा : आ. मंजुळा गावीत यांची मागणी

गणेश सोनवणे

पिंपळनेर, (जि.धुळे) पुढारी वृत्तसेवा-संपूर्ण साक्री तालुक्यात दुष्काळाचे सावट ओढवलेले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी पंचक्रोषीतील नागरिकांचे हाल होत आहेत. यावर उपाय म्हणून पांझरा नदीवरील लाटीपाडा प्रकल्पातून पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षीत केलेले पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी साक्री विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंजुळा गावीत यांनी जिल्हाधिकारी व पाटबंधारे विभागाकडे केली आहे.

जिल्हाधिकारी यांचेसह पाटबंधारे विभागाकडे दिलेल्या पत्रात आ.मंजुळा गावीत यांनी म्हटले आहे की, पांझरा नदी काठावरील पिंपळनेर,सामोडे, म्हसदी प्र.पिंपळनेर,चिकसे, मलांजण,शेणपूर,धाडणे, नवडणे,सायने,कासारे, मालपूर,कोकले,नांदवन, भाडणे या परिसरात ग्रामस्थ तसेच सरपंच ग्रामपंचायत सदस्य,जि.प.पं.स.सदस्य यांनी लेखी पत्र देवून पिण्याच्या पाण्याविषयी समस्या मांडली आहे. मागील वर्षापासून या परिसरात पर्जन्यमान कमी झाल्याने दुष्काळ सदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पांझरा नदी काठालगत असलेल्या पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरींनी तळ गाठला आहे. काही विहिरी कोरड्या पडल्या आहेत. गावकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देण्यास ग्रामपंचायतींना अडचणींचा सामना करावा लागत आहे. याकरीता लाटीपाडा धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षीत केलेले पाणी पांझरा नदी पात्रातून सोडण्यात यावे, अशी मागणी आ.मंजुळा गावीत यांनी जिल्हाधिकारी व पाटबंधारे विभागाकडे तसेच पं.समिती आणि तहसिल कार्यालयाकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.

SCROLL FOR NEXT