Dhule Accused Escape
धुळे : येथे एका महिन्यात दुसऱ्यांदा कैद्याच्या पलायनाची घटना घडल्याने पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे. खुल्या कारागृहातून कैदी पळून जाण्याची घटना नुकतीच ताजी असतानाच, आता खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीने रुग्णालयातून पोलिसांना चकवा देत पळ काढला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी तातडीने विविध पथके तयार करून फरार आरोपीचा शोध सुरू केला आहे. मात्र, अद्याप त्याचा मागमूस लागलेला नाही.
यापूर्वी, धुळे कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला भिकन पिंजारी हा कैदी पसार झाला होता. पिंपळगाव बसवंत परिसरातून पोलिसांनी त्याला पुन्हा अटक केली होती. या घटनेची नोंद धुळे शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती.
दरम्यान, मोहाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत २०२० मध्ये घडलेल्या राहुल मिंड हत्याकांडातील आरोपी गणेश अर्जुन सोनवणे (उर्फ गण्या, डमऱ्या) सध्या न्यायालयीन प्रक्रियेत असून धुळे कारागृहात ठेवण्यात आला होता. प्रकृती बिघडल्याने त्याला उपचारासाठी हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते.
सोमवारी (दि.३०) दुपारी उपचार सुरू असताना, सोनवणे याने बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना गुंगारा देत रुग्णालयातून पळ काढला. ही बाब लक्षात येताच पोलिसांनी रुग्णालय परिसरात त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र तो हाती लागला नाही.
या घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली असून जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना सतर्क करण्यात आले आहे. फरार आरोपीचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान, या घटनेबाबत धुळे जिल्हा कारागृह प्रशासनाला तत्काळ माहिती नव्हती, अशी माहिती समोर येत आहे.