Polio Vaccination Pudhari
धुळे

Dhule Polio Vaccination : पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे जिल्हास्तरीय उद्घाटन; १.८२ लाख बालकांना पोलिओ डोसचे उद्दिष्ट

जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या हस्ते राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ

पुढारी वृत्तसेवा

धुळे : जिल्ह्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे जिल्हास्तरीय उद्घाटन रविवारी उत्साहात पार पडले. जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या हस्ते मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. जिल्ह्यातील ० ते ५ वर्षे वयोगटातील १ लाख ८२ हजार ८४३ बालकांना पोलिओचा डोस देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. यासाठी १५०८ लसीकरण केंद्रांवर ३२६० अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून ६३ ट्रान्झिट पथके आणि ९१ मोबाईल पथके कार्यरत राहणार आहेत.

जिल्हा रुग्णालय येथे पार पडलेल्या या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवींद्र सोनवणे, मुंबई शहरी विभागाचे संचालक डॉ. प्रसाद भंडारी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन बोडके, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. महेश भडांगे, महिला व बाल रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. अश्विनी भामरे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. स्वप्नील पाटील, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विवेक जाधव, डॉ. गीतांजली सोनवणे तसेच विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि परिचारिका प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी सांगितले की, सर्व लसीकरण केंद्रांवर पोलिओचे दोन थेंब देण्यात येतील. त्यानंतर पुढील पाच दिवस घरोघरी जाऊन एकही बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी.पोलिओ पासून बालकांचे संरक्षण करण्यासाठी पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब अत्यंत प्रभावी आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील पाच वर्षांखालील प्रत्येक बालकाला पोलिओचे दोन थेंब पाजून या मोहिमेला यशस्वी करावे.

कोणतेही पात्र बालक लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी आरोग्य विभागाने नियोजनबद्ध पद्धतीने काम करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. प्रत्येक पालकाने आपल्या बालकाला पोलिओचा डोस देऊन १०० टक्के लसीकरण मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT