धुळे, पुढारी वृत्तसेवा: शेतकऱ्यांची कर्जमाफी व दिव्यांगांना मासिक मानधन यांसारख्या मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी धुळे व शिरपूर येथील आमदारांच्या निवासस्थानाबाहेर शनिवारी (दि.12) रोजी मध्यरात्री मशाल आंदोलन केले. धुळ्याचे आमदार अनुप अग्रवाल व शिरपूरचे आमदार काशीराम पावरा यांच्या घराबाहेर हे आंदोलन करण्यात आले.
आंदोलनावेळी प्रहार पक्षाचे जिल्हाध्यक्ष वसंत बोरसे, मंदाकिनी जाधव, संजय विभांडीक, प्रल्हाद पाटील, भारत देवरे, रफिक शाह, प्रशांत माळी आदी कार्यकर्ते उपस्थित होते. आमदार अनुप अग्रवाल यांचे वडील ओमप्रकाश अग्रवाल यांना निवेदन देत शेतकरी व दिव्यांगांच्या मागण्या सादर करण्यात आल्या.
प्रहार पक्षाने राज्यभरात आमदारांच्या घरी अशाप्रकारे आंदोलन करण्यात येत असून, सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने, शेतकरी कर्जमाफी, एमआरईजीएसमधून शेतीसंबंधित खर्चाची भरपाई, व दिव्यांगांना सहा हजार मासिक मानधन तातडीने पूर्ण करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
प्रहार पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या आदेशानुसार, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून हे आंदोलन करण्यात येत आहे. आंदोलकांनी निळ्या शाली, भगवे ध्वज व पेटत्या मशालींसह छत्रपतींच्या जयघोषात आंदोलन केले. शिरपूरमध्ये आमदार पावरा यांनी घराबाहेर येऊन आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेतले.