धुळे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश घेतलेल्या उपनेत्या शुभांगीताई पाटील यांनी ठाकरे गटाच्या महिला शिवसैनिकांना काळी जादू करण्याची धमकी दिल्याची तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे सौ पाटील यांच्या समर्थकांनी धमकी देण्याचे सत्र सुरू केल्याचा खळबळजनक आरोप देखील ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी केला आहे. या संदर्भात तातडीने कारवाई करावी ,अशी मागणी करण्यात आली आहे.
शिक्षक संघटनेच्या माध्यमातून आपल्या कामाचा ठसा उमटवणाऱ्या सौ शुभांगीताई पाटील यांनी ठाकरे गटाची साथ सोडून थेट शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. या शिवसेनेत प्रवेश करताच त्यांना उपनेते पद बहाल करण्यात आले. यावरून ठाकरे यांच्या धुळे जिल्हा शिवसेनेने सौ. पाटील यांच्यावर सोशल मीडियावरून टीकेची झोड उठवली आहे. मात्र आता याच कारणावरून दोन्ही शिवसेना समोरासमोर येण्याचे चित्र तयार झाले आहे.
सौ. पाटील यांच्या समर्थकांनी ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना काळी जादू करण्याची धमकी दिल्याचा खळबळ जनक आरोप देखील करण्यात आला आहे. या संदर्भात पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज देण्यात आला आहे. या अर्जामध्ये गंभीर स्वरूपाची टीका करण्यात आली आहे.यावेळी जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे महिला आघाडीच्या संगीता जोशी, जयश्री वानखेडे, अरुणा मोरे, सुनिता शिरसाट , उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी, धिरज पाटील , प्रशांत ठाकूर,संदीप सूर्यवंशी , आण्णा फुलपगारे, शिवाजी शिरसाळे, महादु गवळी, सुनिता चौधरी, हिमांशू परदेशी आदींची उपस्थिती होती.
सौ.शुभांगी पाटील यांना आमच्या पक्षाने मानाची पदे देवूनही त्या अमिषाला बळी पडून शिंदेेंच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला. मात्र त्यांनी प्रतिक्रीया देतांना मी शिवसेना पक्षात जात आहे, असे वक्तव्य केले. तसेच सौ.शुभांगी पाटील यांनी आमच्या महिला पदाधिकार्यांना दमबाजी व धमकावण्याचा प्रयत्न केला. यापुढे माझ्या पोस्ट व्हायरल कराल तर काळी जादू करेल ,अशी धमकी दिल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
तसेच त्यांचा मुलगा, ड्रायव्हर व काही निनावी फोन करुन नरेंद्र परदेशी, प्रशांत ठाकुर, तेजस सपकाळे, यांना देखील धमकी दिली. स्वत: सौ.शुभांगी पाटील यांनी नरेंद्र परदेशी यांच्याशी फोनवरुन हुज्जत घातली. नरेंद्र परदेशी यांनी त्यांना तुम्हाला काही चुकीचे वाटत असल्यास तुम्ही कायदेशीर दाद मागा, पण असे फोनवर भांडण करु नका, असे सांगूनही त्यांच्या मुलाने नरेंद्र परदेशी यांना 4 ते 5 वेळा फोन करुन धमकावण्याचा प्रयत्न केला. असा आरोप यावेळी ठाकरे यांच्या शिवसैनिकांनी पोलीस प्रशासनाकडे केला आहे.
महीलांना काळी जादू करेल, असा दम दिल्याने महिल्या धास्तावल्या आहेत. त्या मानसिकदृष्ट्या विचलीत झाल्या आहेत. काळ्या जादूची भिती महिलांना साहजिकच वाटून त्या भयभीत होतात. या मानसिकतेचा गैरफायदा शिक्षित सौ.पाटील या घेत आहेत, असा आरोप देखील यावेळी करण्यात आला. पाटील यांच्याविरुध्द अंधश्रध्दा निर्मूलन कायदा, जादुटोणा विरोधी कायदा 2013 अंतर्गत गुन्हे दाखल करावेत, अशी तक्रार करण्यात आली आहे.
धुळे : शेतकऱ्यांचे पशुधन चोरी करणाऱ्या चौघांच्या टोळीकडुन 5 म्हशी, 5 बकऱ्या व 2 बोकड हस्तगत केले. या प्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाणे यांनी पशुधन चोरीच्या 3 गुन्ह्यांची उकल केली आहे. या आरोपींनी आणखी काही ठिकाणी चोरी केल्याचा संशय पोलिसांना आहे.
धुळे तालुक्यातील नेर व उडाणे गावातुन शेतकऱ्याचे पशुधन (म्हशी, बकऱ्या व बोकड) चोरीच्या घटना घडल्याने धुळे तालुका पोलीस ठाणे येथे 3 गुन्हे दाखल आहेत. या घटनांची संवेदनशिलता व गांभीर्य पहाता पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांना पशुधन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक धनंजय पाटील, यांनी तपास पथक तयार करुन पशुधन व आरोपी यांचा शोध होण्याकरीता रवाना केले.
पथकाने घटनास्थळ व महामार्गावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे विश्लेषण केले. त्यातच पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांना तांत्रिक विश्लेषणाचे आधारे हा गुन्हा प्रभु होडया गावीत ( रा.उचीशेवडी ता. नवापुर) ,अभित जलु गावीत ( रा. करंजी बु. ता. नवापुर) योहान जेनु गावीत (रा. अंठीपाडा ता. नवापुर), सुरेश रमेश गावीत, ( रा. सारवट ता. नवापुर) यांनी संघटितपणे केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे या आरोपींना ताब्यात घेण्यात आले. प्राथमिक चौकशीतच त्यांनी चोरी केलेले पाच म्हशी, पाच बकऱ्या आणि दोन बोकड असे पशुधन पोलीस पथकाला उपलब्ध करून दिले आहे.