Give us a majority in the Dhule Municipal Corporation: Harshvardhan Sapkal
मुंबई / धुळे : काँग्रेस पक्ष सर्वांना सोबत घेऊन चालणारा असून विविधतेत एकता जपण्याचे काम करत आहे. याउलट भाजपाचे राजकारण समाजात तोडफोड निर्माण करणारे असून जाती-धर्मांत तेढ निर्माण करून सामाजिक सलोखा बिघडवण्याचे आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.
धुळ्यातील कार्यकर्त्यांचा प्रवेश सभेत बोलताना सपकाळ म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला घवघवीत यश मिळाले त्याचप्रमाणे नगरपालिका निवडणुकीतही पक्षाने बाजी मारली आहे. धुळे जिल्ह्यातून शोभा बच्छाव यांना लोकसभेत पाठवले. आता येणाऱ्या धुळे महानगरपालिका निवडणुकीत देखील काँग्रेसलाच एकहाती सत्ता द्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. सपकाळ म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत देखील एकमेव काँग्रेसच्या नेतृत्वाखाली देश एकवटला. लाखो लोकांनी त्याग आणि बलिदान दिले. तो वारसा काँग्रेसकडेच आहे.
विविध पक्षांतील पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत धुळ्यात विविध पक्षांतील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यामध्ये सलग तीन वेळा निवडून आलेले समाजवादी पार्टीचे नगरसेवक अमीन पटेल, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी उपमहापौर हाजी शव्वाल अन्सारी, परवेझ शेख, अजहर पठाण, एमआयएमचे गनी डॉलर, जुनेद पठाण, शिवसेनेचे प्रेम सोनार, भाजपाचे मुर्तुजा अन्सारी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
यावेळी खासदार डॉ. शोभा बच्छाव, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष भाई नगराळे, राजाराम पानगव्हाणे, धुळे शहर काँग्रेस अध्यक्ष साबीर शेख, जावेद फारुखी, धुळे ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रविणबापू चौरे, डॉ. दरबारसिंग गिरासे तसेच मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.