धुळे : धुळे येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील कर्मचाऱ्यांनीच संगनमत करून शासनाची तब्बल १ कोटी ५५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, चार कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.
तपासानुसार, डिसेंबर २०२४ ते एप्रिल २०२६ या कालावधीत पोलीस प्रशिक्षण केंद्रात कार्यरत असलेले कनिष्ठ श्रेणी लिपिक मनोजगिर जगदीशगिर बुवा, कनिष्ठ श्रेणी लिपिक जगदीश देविदास सोनवणे, सहाय्यक उपनिरीक्षक (एएसआय) नरेशगिर सुरेशगिर गोसावी आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोज अशोक खोंडे यांनी संगनमत करून हा गैरप्रकार केला.
या कर्मचाऱ्यांच्या वेतनात शासनाकडून कोणत्याही प्रकारचे बेसिक एरिअर्स मंजूर नसतानाही, त्यांनी ऑनलाइन 'सेवार्थ' प्रणालीमध्ये फेरफार करून बेसिक एरिअर्स या शीर्षकाखाली स्वतःच्या वेतनात एकूण १ कोटी ५५ लाख रुपयांची बेकायदेशीर वाढ केली. त्यानंतर ही रक्कम त्यांच्या वेतन खात्यांमध्ये जमा करून शासनाचा विश्वासघात, फसवणूक आणि शासकीय निधीचा अपहार केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच धुळे शहर पोलिसांनी तातडीने कारवाई करत मनोजगिर जगदीशगिर बुवा, जगदीश देविदास सोनवणे, नरेशगिर सुरेशगिर गोसावी आणि मनोज अशोक खोंडे यांना अटक केली. या आर्थिक गैरव्यवहाराचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असून, पोलीस उपअधीक्षक विश्वजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सखोल तपास सुरू आहे.