धुळे

Dhule Crime| धुळ्यात एमडी ड्रग्ससह अवैध दारूसाठा जप्त; दोघांवर गुन्हे दाखल

४५ हजारांहून अधिकचा मुद्देमाल जप्त; शहर पोलिसांची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

धुळे : धुळे शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने एका कारवाईत एमडी (मेफेड्रॉन) या घातक अंमली पदार्थासह अवैध देशी-विदेशी दारूचा साठा गुरूवारी (दि.२०) जप्त केला. या प्रकरणी दोघा तरुणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याविरोधात धुळे शहर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायदा आणि महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धुळ्याचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी जिल्ह्यात अंमली पदार्थ आणि अवैध दारूविक्रीविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश सर्व पोलीस ठाण्यांना दिले होते. याच पार्श्वभूमीवर धुळे शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांना एमडी ड्रग्सच्या तस्करीची गोपनिय माहिती मिळाली. त्यांनी ही माहिती तात्काळ पोलीस अधीक्षकांच्या निदर्शनास आणून देत कारवाईचे नियोजन केले.

पोलीस पथकाने सापळा रचून धुळे शहरातील गणपती मंदिराच्या पश्चिमेकडील पांझरा नदीकाठच्या सर्व्हिस रोडवरून कुणाल भीमराव वारुडे (रा. जयहिंद कॉलनी, देवपूर) याला मोटारसायकलसह ताब्यात घेतले. अंगझडती घेतली असता त्याच्या खिशात एमडी ड्रग्स सदृश्य पांढऱ्या रंगाची पावडर आढळली.

पोलिसांनी कसून चौकशी केली असता, कुणालने हे ड्रग्स दीपक शंकर कापुरे (रा. वाडीभोकर गाव, देवपूर) याच्याकडून घेतल्याची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी तातडीने दीपक कापुरे यालाही ताब्यात घेतले. त्याच्या घराची झडती घेतली असता एमडी ड्रग्ससह मोठ्या प्रमाणावर अवैध देशी-विदेशी दारूचा साठा पोलिसांच्या हाती लागला. या कारवाईत दोन्ही आरोपींकडून ५,हजार आणि २ हजार पाचशे रुपये किमतीचे अंमली पदार्थ तसेच अवैध देशी-विदेशी दारू असा एकूण ४५ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी दोन्ही आरोपींविरोधात धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT