Gotskari Case Dhule
धुळे : फळे व भाजीपाल्याच्या आडून सुरू असलेली गोतस्करी उघड करत दोंडाईचा व शिंदखेडा पोलिसांनी संयुक्तपणे मोठी कारवाई केली. दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये एकूण १४ जनावरांना जीवदान देण्यात पोलिसांना यश आले असून, शिरपूर येथील तिघा संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोंडाईचा पोलिसांना संशयित वाहनाची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांची चाहूल लागताच चालकाने वाहन वेगाने पळवले. अखेर मालपूर चौफुलीवरील संतोषी माता मंदिराजवळ वाहन सोडून आरोपी पसार झाले. पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता चार गोऱ्हे आणि दोन गायी आढळून आल्या. विशेष म्हणजे, जनावरे लपवण्यासाठी फळे व भाजीपाल्याच्या क्रेट्सचा वापर करण्यात आला होता. या कारवाईत सहा जनावरांना वाचवण्यात आले असून वाहन जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक दिनेश सोनवणे करत आहेत.
दरम्यान, शिंदखेडा पोलिसांनीही मुंबई–आग्रा महामार्गावरील बाभळे फाट्यावर वाहन तपासणीदरम्यान आणखी एक कारवाई केली. विना क्रमांकाच्या वाहनासह एका कारमध्ये आठ जनावरांची तस्करी होत असल्याचे उघड झाले. पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून सर्व जनावरे ताब्यात घेतली व त्यांना गोशाळेत हलवण्यात आले.
या प्रकरणी शिरपूर येथील अखिल शेख दगू कुरैशी, नाझीम शहा नथू शहा फकीर आणि शाहरुख शरीफ तैली यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही जनावरे नेमकी कुठून आणली आणि कत्तलीसाठी कुठे नेली जात होती, याचा तपास पोलीस करत आहेत.