Illegal Tobacco Seized in Pimpalner police
पिंपळनेर : गुजरातहून दहीवेलमार्गे सटाण्याकडे जाणारा अवैध तंबाखूजन्य माल वाहून नेणारा ट्रक पिंपळनेर पोलिसांनी पाठलाग करून पकडला. या कारवाईत तब्बल 67 लाख 21 हजार 200 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सहायक पोलीस निरीक्षक किरण बर्गे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला. पहाटे सुमारे 3 वाजता एम.एच.18 बी.जी.3473 हा ट्रक ताब्यात घेण्यात आला. तपासणीदरम्यान ट्रकमध्ये परच्युटनच्या बॉक्सच्या आड मोठ्या गोण्या आणि पिशव्यांमध्ये महाराष्ट्रात बंदी असलेली सुगंधीत स्वीट सुपारी आणि सुगंधीत तंबाखू सापडली.
या कारवाईत सुगंधीत स्वीट सुपारी व तंबाखू 43,67, 200, परच्युटन बॉक्स 8,54,000, ट्रक 15,00,000 असा मिळून एकूण 67, 21, 200 किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. अज्ञात चालकाविरुद्ध भारतीय दंड संहिता व अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे व उपविभागीय पोलीस अधिकारी (साक्री) संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे, पोलीस उपनिरीक्षक विजय चौरे, भुषण शेवाळे यांच्यासह पोहेकों कांतीलाल अहिरे, पोकों रविंद्र सुर्यवंशी, पंकज वाघ, दावल सैंदाणे, सोमनाथ पाटील, संदिप पावरा, योगेश महाले, दिनेश माळी आणि विजयकुमार पाटील यांनी केली.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय चौरे करीत आहेत.