धुळे : राज्यभरात खिडकीचे ग्रील काढून घरफोड्या करणाऱ्या बीड जिल्ह्यातील कुख्यात ‘खिडकी गॅंग’ला धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे. निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई करत टोळीतील पाचही सदस्यांना गजाआड केले.
‘खिडकी गॅंग’ च्या गुन्हेगारांविरोधात राज्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये शंभरहून अधिक गुन्हे दाखल असून, ही टोळी पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत होती. त्यांच्या अटकेनंतर आणखी अनेक गंभीर गुन्ह्यांचा तपास उलगडण्याची शक्यता असल्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सांगितले.
५ डिसेंबर २०२४ रोजी धुळे शहरातील महिंदळे शिवारातील राजेंद्रनगर येथे पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी खिडकीचे ग्रील तोडून घरात प्रवेश केला होता. रघुनाथ सोनार यांच्या घरी झालेल्या या चोरीत लग्नासाठी साठवलेले दागिने व रोकड असा १२ लाख ७८ हजार ८०५ रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला होता. याप्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता, एका पांढऱ्या रंगाच्या संशयित वाहनाचा तपास सुरू झाला. त्या आधारे लळींग टोलनाका आणि इतर टोलनाक्यांचे फूटेज तपासण्यात आले. फास्टॅग नंबर आणि संबंधित मोबाईल क्रमांकांच्या साह्याने तब्बल ६०० संशयित नंबर शोधण्यात आले. तांत्रिक विश्लेषणाच्या माध्यमातून या गॅंगचा तपास थेट बीडपर्यंत गेला.
मोबाईल लोकेशनच्या आधारे पोलिसांनी पाचही आरोपींना अटक केली असून शेख अशफाक शेख आसिफ (रा. मोहम्मदिया कॉलनी, बीड), आगामिर खान जहागिर खान पठाण (रा. मोहम्मदिया कॉलनी, बीड) , फिरोज रेहमान शेख (रा. घोडेगाव, आहिल्यानगर), ऐफाझ शेख अनिस शेख (रा. पिंपळगाव, गेवराई, बीड), शेख कलीम शेख अलीम (रा. दहिफळ, बीड) अशी आरोपींची नावे आहेत.
या आरोपींनी धुळे शहरात दोन ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली असून, त्यांच्याकडून चोरी गेलेले ११ लाख ३२ हजार रुपयांचे दागिने, गुन्ह्यात वापरलेले वाहन, मोबाईल व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.
या आरोपींवर राज्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये १०० हून अधिक गुन्हे दाखल आहेत. फिंगरप्रिंट तपासणीतून हे आरोपी पुर्वीही अनेक गुन्ह्यांमध्ये अटक झाल्याचे स्पष्ट झाले. विशेषतः शेख अशफाकवर २४, आगामिर खानवर २०, शेख कलीमवर ९, तर फिरोजवर १ गुन्ह्याची नोंद आहे. पाचवा आरोपीही कुख्यात गुन्हेगार असल्याचा पोलिसांना संशय आहे. या आरोपींविरुद्ध यापूर्वी अनेकवेळा कारवाई झाली असून, पुराव्याअभावी ते सुटत असल्याचे देखील पोलिसांनी नमूद केले आहे.