पिंपळनेर, जि. धुळे : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या पिंपळनेर येथील कार्यक्रमानंतर धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) विशाल नरवडे यांनी आमदार मंजुळा गावित यांच्यासोबत वार्सा फाट्यालगत असलेल्या शेतकऱ्यांसमवेत राजाराम चौरे यांच्या शेताला भेट दिली. यावेळी भात पिकाच्या लागवडीची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.
सीईओ नरवडे आणि आमदार गावित यांनी स्वतः चिखलात उतरून दोन तास मजुरांसोबत भात लागवडीचा अनुभव घेतला. त्यांनी शेतमजुरांकडून लागवडीची माहिती घेतली आणि शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्या. त्यांच्या समवेत साक्री गट विकास अधिकारी शशिकांत सोनवणे व विस्तार अधिकारी शशिकांत ठाकरे देखील उपस्थित होते.
दौऱ्यादरम्यान पावसाचे प्रमाण, विविध पिकांची स्थिती, तसेच खत व बियाण्यांच्या तुटवड्याबाबत सविस्तर चर्चा झाली. जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय ठेवत शेतकऱ्यांच्या समस्या कमी करण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू राहील, असे आश्वासन सीईओ नरवडे यांनी दिले.
आमदार मंजुळाताई गावित यांची शेतात उतरून भात लागवड करणे ही केवळ प्रतिकात्मक कृती नव्हे, तर शेतकऱ्यांच्या श्रमाला दिलेला सन्मान आणि त्यांच्या संघर्षात खांद्याला खांदा लावून उभे राहण्याचा प्रेरणादायी संदेश आहे.