धुळे

Dhule News | शिंदखेडा तालुक्यातील विखुर्ले रहिमपूर कारखाना बंद; संतप्त शेतकऱ्यांचा कारखाना जमिनीवर ताबा

जमीनी ताब्यात घेऊन कसण्यास सुरवात, परिसरात खळबळः जवळपास ३४०० एकर जमिन प्रकल्पासाठी संपादित

पुढारी वृत्तसेवा

प्रतिनिधी : शिंदखेडा तालुक्यातील विखुर्ले रहिमपूर येथे शेतकऱ्यांनी साखर कारखान्यासाठी दिलेल्या जमिनी परत ताब्यात घेत स्वतः शेती करण्यास सुरुवात केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, १९९० च्या दशकात परिसराचा विकास होईल, रोजगार निर्मिती होईल आणि ऊस उत्पादकांना बाजारपेठ मिळेल, या आशेने शेतकऱ्यांनी अत्यंत माफक दरात सुमारे ८ ते ९ हजार रुपये प्रति एकर जमिनी कारखान्यासाठी दिल्या होत्या. जवळपास ३४०० एकर जमिन या प्रकल्पासाठी संपादित करण्यात आली होती. विखुर्ले व रहिमपूर या दोन्ही गावातील शेतकऱ्यांचा यात सहभाग होता. मात्र मोठ्या अपेक्षेनं उभारलेला साखर कारखाना प्रकल्प केवळ सुरुवातीस हंगामी झलक दाखवून बंद पडला. त्यानंतर कित्येक वर्षे हा प्रकल्प रखडत राहिला. नंतर शासनाने हा कारखाना व कारखाना प्रकल्पाची जमीन एका खासगी कंपनीला विकल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त करत सांगितले की कारखान्याच्या साधन सामग्री विक्रीला आमचा विरोध नाही, मात्र आमच्या वडिलोपार्जित जमिनी विकण्याचा अधिकारी शासनाला कोणी दिला? आम्ही विकासाच्या आशेने जमिनी दिल्या होत्या विक्रीसाठी नाही. दरम्यान सुमारे ५५ कोटी रुपयांचा साखर कारखाना मात्र १० कोटी रुपयांत विक्री झाल्याची माहिती समोर येत असून संबंधित कंपनीने कारखानासह जमिनीवर ताबा घेतल्याचे कळताच शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला.

या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि पोलीस प्रशासनाला निवेदन देत आमच्या जमिनी आम्हाला परत मिळाव्यात अशी ठाम मागणी केली होती. याबाबत शेतकऱ्यांच्या वतीने आंदोलनाचा इशारा ही देण्यात आला होता. आता त्याच इशाऱ्याची अंमलबजावणी करताना सुमारे १५० शेतकऱ्यांनी आपापल्या शेतजमिनीत औत जुंपून प्रत्यक्ष शेतीस सुरुवात केली. काही ठिकाणी नांगरणी, पेरणीपूर्व मशागत सुरू असल्याचे निदर्शनास आले. शेतकऱ्यांच्या या अचानक कृतीमुळे प्रशासन आणि पोलिसांची काही वेळ धावपळ उडाली. दरम्यान आमची जमीन हक्क आमचा , आमची जमीन आम्हीच कसणार अशा जोरदार घोषणा शेतकऱ्यांनी दिल्या. या प्रकरणात आता प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT