FDA 
धुळे

Dhule News : धुळ्यात आराम बस मधून वाहतूक होणारा संशयित खव्याचा साठा जप्त

गुजरात राज्यातून येणाऱ्या आराम बसची अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून तपासणी

पुढारी वृत्तसेवा

धुळे : आगामी दसरा, दिवाळी सण उत्सवाच्या पार्श्वभुमीवर दुग्धजन्य पदार्थांमध्ये भेसळीची शक्यता लक्षात घेता राज्यातील अन्न आणि औषध प्रशासन विभाग अलर्ट मोडवर आले आहे. त्यानुसार धुळे येथील अन्न आणि औषध प्रशासन विभागाने गुजरात राज्यातून येणाऱ्या एका आराम बसची तपासणी केली असता त्यात १ हजार ८५४ किलो मावा (खवा) आढळून आला आहे. या मावा मध्ये भेसळ असल्याची संशय आल्याने अन्न व औषध प्रशासनाने सुमारे ५ लाख ८० हजार ५०० रुपये किंमतीचा मावा जप्त केला आहे.

अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात अन्न सुरक्षा मोहीम सुरू आहे. त्याअंतर्गत अहमदाबादहून छत्रपती संभाजीनगरकडे मावा वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती प्रशासनाला मिळाली त्यानुसार साक्री रोडवरील विद्यावर्धिनी महाविद्यालयासमोर धनबाबा दीपसिंगजी बसची पंजाब लक्झरी (क्र. एआर-०१-क्यु-४२४२) तपासणी करण्यात आली. बसमध्ये विविध कंपन्यांचा मावा आढळून आला.

पुढील कारवाईसाठी बस दिसान कोल्ड स्टोरेज येथे नेण्यात आली. तेथे विविध प्रकारच्या माव्याचे ११ नमुने घेऊन १,८५४ किलो साठा जप्त करून सुरक्षित ठेवण्यात आला. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे यावेळी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान लक्झरी चालक वाहनचालक सुलेमान उमरभाई मोदन व क्लिनर अल्ताब, दोघेही अहमदाबाद (गुजरात) येथील रहिवासी आहेत.

ही कारवाई अन्न व औषध प्रशासन नाशिक विभागाचे सहआयुक्त मंगेश माने, सहाय्यक आयुक्त (अन्न) गो. वी. माहोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी आनंद पवार, शशिकांत राणे, अरविंद राऊत व मंगेश भावसार यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT