धुळे

Dhule news | सोनगीर मध्यवर्ती बसस्थानकासाठी ग्रामस्थ आणि कृती समिती आक्रमक

जागेचा ताबा महामंडळाकडे मिळवण्यासाठी ग्रामस्थांनी आता 'आरपार'ची लढाई लढण्याचा निर्धार केला आहे

पुढारी वृत्तसेवा

सोनगीर : धुळे तालुक्यातील सोनगीर येथे गेल्या पन्नास वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मध्यवर्ती बसस्थानकाच्या मागणीसाठी आता ग्रामस्थ आणि तरुण आक्रमक झाले आहेत. यासंदर्भात 'मध्यवर्ती बस स्थानक कृती समिती'च्या वतीने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक पुरुषोत्तम व्यवहारे यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आले.

सुमारे 35 हजार लोकसंख्या असलेल्या सोनगीर गावाला शिरपूर, धुळे आणि दोंडाईचा या तिन्ही दिशांना जाण्यासाठी सध्या तीन वेगवेगळ्या ठिकाणी बस थांबे आहेत. प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी हे तिन्ही थांबे एकत्रित करून एका मध्यवर्ती बस स्थानकाची निर्मिती व्हावी, अशी मागणी गेल्या पाच दशकांपासून केली जात आहे.बस स्थानकासाठी पोलीस ठाण्यासमोर गट नंबर 65 मध्ये सुमारे चार एकर जागा ग्रामपंचायत स्तरावर आरक्षित आहे. मात्र, सध्या या कोट्यवधी रुपये किमतीच्या जागेवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण होत आहे. हे अतिक्रमण रोखण्यासाठी आणि जागेचा ताबा महामंडळाकडे मिळवण्यासाठी ग्रामस्थांनी आता 'आरपार'ची लढाई लढण्याचा निर्धार केला आहे.

शिष्टमंडळाशी चर्चा करताना विभाग नियंत्रक पुरुषोत्तम व्यवहारे यांनी स्पष्ट केले कि, वरिष्ठ कार्यालयाने मंजुरी दिल्यास या जागेवर तात्काळ दहा बाय चाळीस फूट आकाराचे पिकअप शेड उभारणे शक्य आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून महसूल विभागाकडून ही जागा महामंडळाच्या ताब्यात घेण्यासाठी जलद गतीने प्रयत्न केले जातील. लोकप्रतिनिधींच्या निधीतून या जागेचा विकास करण्याबाबतही यावेळी सकारात्मक चर्चा झाली.

या मागणीसाठी गावातील तरुणांनी एकत्र येत सर्वपक्षीय कृती समिती स्थापन केली आहे. या समितीने नुकतेच जिल्हाधिकाऱ्यांचीही भेट घेतली होती. लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून या जागेचा विकास करण्यासाठी गावकरी सर्वतोपरी सहकार्य करतील, अशी ग्वाही यावेळी देण्यात आली. याप्रसंगी कृती समितीचे निमंत्रक मुरलीधर मोरे, प्रमोद धनगर, अमित बागुल, रविराज माळी, संदीप गुजर, किशोर पावनकर, जितेंद्र बागुल, दिनेश देवरे, निखिलसिंग परदेशी, संदीप पाटील, हसन खा पठाण, अनिल पाटील आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT