धुळे : शिरपूर तालुक्यातील दहिवद शिवारातील एका पत्र्याच्या शेडवर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने धाड टाकून सुमारे १ लाख ५३ हजार रुपये किमतीचा अवैध विदेशी दारूसाठा जप्त केला आहे. पोलीस पथकाला पाहताच दारू तस्कराने घटनास्थळावरून पोबारा केला असून, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धुळ्याचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी अवैध विदेशी दारूची विक्री आणि वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी सतर्क झाले आहेत. दरम्यान, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक श्रीराम पवार यांनीही आपल्या पथकाला अवैध दारूधंद्यांवर कारवाईचे आदेश दिले होते. याच अनुषंगाने, शिरपूर तालुक्यातील दहिवद शिवारात दारूची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती निरीक्षक पवार यांना मिळाली.
मिळालेल्या माहितीनुसार, कळमसरे-शिरपूर रस्त्यावरील दहिवद गावाच्या शिवारातील एका शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये एक इसम विक्रीच्या उद्देशाने अवैध विदेशी दारू साठवून ठेवत असल्याचे निष्पन्न झाले. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाड टाकली. पोलिसांना पाहताच संशयित इसम पळून गेला. शेडची झडती घेतली असता, तेथे परवाना नसलेली अवैध विदेशी दारू मिळून आली.
या प्रकरणी संशयित आरोपी रमेश जाटीराम पवार याच्या विरोधात शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.