धुळे

Dhule News : शिंदखेडा तालुक्यात बुराई नदी पात्रातून अवैध वाळू उपसा सुरू; मुखमंत्र्यांना निवेदन देत तत्काळ कार्यवाहीची मागणी

पुढारी वृत्तसेवा

सोनगीर (धुळे) : शिंदखेडा तालुक्यातील बुराई नदीपात्रातून सुरू असलेल्या अवैध वाळू उपशामुळे प्रशासनासमोर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सामाजिक कार्यकर्ते तथा माजी सैनिक नरेंद्र गोकुळ पाटील ऊर्फ सोनू फौजी यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे निवेदन पाठवून यावर तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.

शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून बुराई नदीच्या पात्रातून दिवस-रात्र अवैध वाळू उपसा सुरू असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. महसूल प्रशासनातील काही अधिकारी आणि स्थानिक पातळीवरील यंत्रणा याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोपही पाटील यांनी केला आहे. निवेदनानुसार, अवैध वाळू उपशामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत असून नदीपात्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. रात्रीच्या वेळी ट्रॅक्टर, डंपर आणि इतर वाहनांद्वारे मोठ्या प्रमाणावर वाळूची अवैध वाहतूक केली जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी शासनाचे कडक आदेश असतानाही स्थानिक प्रशासन प्रभावी कारवाई करत नसल्याने वाळू माफियांना अभय मिळत असल्याचा आरोप होत आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. वाळू माफियांकडून अनेकदा प्रशासनातील अधिकाऱ्यांवर दबाव टाकला जातो, मात्र संबंधितांवर कठोर गुन्हे दाखल होत नसल्यामुळे त्यांचे मनोबल वाढत आहे. त्यामुळे चिमठाणे परिसरातील नागरिकांनी तत्काळ हस्तक्षेप करून हा अवैध उपसा बंद करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, प्रशासनाने वेळेत कारवाई न केल्यास चिमठाणे परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने मोठे आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. या निवेदनाच्या प्रती महसूल मंत्री, पोलीस महासंचालक आणि धुळे पोलीस अधीक्षक यांनाही पाठवण्यात आल्या आहेत. आता प्रशासन यावर काय पाऊल उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT