धुळे : धुळे तालुक्यातील अजनाळे येथील पारधी वस्तीवरील दोन शिक्षकी शाळेत पटसंख्यानुसार विद्यार्थीच उपलब्ध नसल्याची बाब निदर्शनास आल्याने शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी तातडीने मुख्याध्यापक किशोर परदेशी यांना निलंबित करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांना दिले आहेत. दरम्यान 15 दिवसात या शाळेच्या परिसराची स्वच्छता आणि अन्य त्रुटी दूर न केल्यास आणखी कडक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे हे आज एका कार्यक्रमासाठी धुळे येथे येणार होते. यासाठी ते मालेगाव ते कुसुंबा महामार्ग वरून अजनाळे मार्गे धुळे शहरात येण्यासाठी निघाले. मात्र वाटेत अजनाळे गावातील पारधी वस्तीवर असणाऱ्या शाळेवर त्यांनी अचानक भेट दिली . यावेळी या शाळेत एकच शिक्षक उपस्थित असल्याची बाब निदर्शनास आली.
विशेष म्हणजे पटावर 40 विद्यार्थी असताना केवळ सातच विद्यार्थी शाळेत दिसून आले. दुसरा शिक्षक विद्यार्थ्यांना बोलवण्यासाठी गेल्याची माहिती मंत्री भुसे यांना देण्यात आली. मात्र या शाळेत उपस्थित विद्यार्थ्यांचे गणवेश योग्य पद्धतीचे नव्हते. तसेच शाळेचा परिसर देखील स्वच्छ केलेला नव्हता. त्यामुळे मंत्री भुसे कमालीचे संतापले . त्यांनी तातडीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बेलदार यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क करून या सर्व परिस्थितीचा जाब विचारला.
या नंतर संबंधित मुख्याध्यापक किशोर परदेशी यांना निलंबित करण्याचे आदेश बेलदार यांना दिले. दरम्यान याच वेळी त्यांनी गटशिक्षणाधिकारी तसेच शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना देखील संपर्क करून या शाळे संदर्भातील कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश केले आहे. येत्या पंधरा दिवसात तातडीने परिस्थितीमध्ये सुधार करावा, असे आदेश देखील त्यांनी दिले आहेत.