धुळे : केंद्र शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे देशात दहशतवादी कारवाया वाढल्या असून भारतीय जवान शहीद होत असल्याची टीका आज शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने केली. जम्मू काश्मिर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात निदर्शने करीत केंद्र शासनाच्या विरोधात यावेळी प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली.
शहरातील जुनी महानगरपालिका समोर झालेल्या या आंदोलनात शिवसेना सह संपर्कप्रमुख महेश मिस्त्री जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, माजी आ. शरद पाटील, किरण जोंधळे, धीरज पाटील, डॉ. सुशील महाजन, देविदास लोणारी, भरत मोरे, ललित माळी, प्रफुल्ल पाटील, कैलास मराठे, कपिल लिंगायत, मनोज शिंदे , भटू गवळी, प्रवीण साळवे, आनंद जावडेकर, हरीश माळी, मनोज जाधव, सिद्धार्थ करणकाळ, सुनील चौधरी, संदीप चौधरी आदी उपस्थित होते. याप्रसंगी शिवसैनिकांच्या वतीने आतंकवादी हल्ल्याचा निषेध करून प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली.
गेल्या दीड महिन्यात अनेक आतंकवादी हल्ल्यात एकट्या जम्मू विभागात एप्रिल ते 16 जुलै पर्यंत 12 जवान व 10 नागरीक शहीद झाले आहेत. या भागात अतिरेक्यांच्या अनेक टोळ्या सहभागी असून या अतिरेक्यांना कंठस्थानी घालण्यात अद्यापही यश आलेले नाही. केंद्र सरकारचे हे अपयश असून काश्मीर नंतर आता अतिरेक्यांनी जम्मू विभागाला टार्गेट केल्यामुळे देशाची सुरक्षितता धोक्यात आलेली आहे असा आरोप यावेळी शिवसेनेच्या वतीने करण्यात आला.
आतंकवादी हल्ल्याचा जाहीर निषेध करत केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच या अतिरेक्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करून या दहशतवादी कारवाया देशाच्या संरक्षण विभागाने युद्ध पातळीवर थांबवण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली.