धुळे

Dhule News : धुळ्यात पोलिसांची मोठी कारवाई, आंतरराष्ट्रीय नशाविरोधी दिनी कोट्यवधींचे अंमली पदार्थ केले नष्ट

पुढारी वृत्तसेवा

धुळे : आंतरराष्ट्रीय नशाविरोधी दिनाचे औचित्य साधून धुळे जिल्हा पोलिसांनी अंमली पदार्थांच्या तस्करीविरुद्ध एक मोठी आणि कडक कारवाई केली आहे. जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये २५ गुन्ह्यांत जप्त करण्यात आलेला सुमारे २ कोटी ९ लाख ४९ हजार ३८० रुपये किमतीचा अमली पदार्थांचा साठा आज पोलीस मुख्यालयातील खड्ड्यात पुरून नष्ट करण्यात आला.

गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम (NDPS Act) १९८५ अंतर्गत दाखल गुन्ह्यांमधील हा जप्त मुद्देमाल होता. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर धुळ्याचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या आदेशान्वये या मालाची विल्हेवाट लावण्यात आली.

विविध पोलीस ठाण्यांतील मुद्देमाल जप्त

जिल्ह्यातील चाळीसगाव रोड, मोहाडीनगर, पश्चिम देवपूर, दोंडाईचा, थाळनेर, शिंदखेडा आणि शिरपूर शहर पोलीस ठाण्यांतर्गत एकूण २३ गुन्ह्यांमध्ये हा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.

नष्ट करण्यात आलेले अंमली पदार्थ

  • गांजा: १ कोटी ८० लाख ३० हजार १२० रुपये किमतीचा ९०१.५०६ किलो गांजा.

  • अफूची बोंडे: २६ लाख ८ हजार ५०० रुपये किमतीची १७३.९०० किलो अफूची बोंडे.

  • एमडी पावडर: ९,४०० रुपये किमतीची ९४ ग्रॅम एमडी (MD) पावडर.

  • कफ सिरप: ३ लाख ७२० रुपये किमतीच्या २,१४८ कोडीन फॉस्फेट कफ सिरपच्या बाटल्या.

  • अल्प्रझोलम टॅब्लेट्स: ६४० रुपये किमतीच्या २२० स्ट्रिप्स (औषधांच्या गोळ्या).

वरिष्ठ समितीच्या उपस्थितीत पडताळणी

हा मुद्देमाल नष्ट करण्यापूर्वी धुळे जिल्हास्तरीय प्रादेशिक अंमली पदार्थ नाश समितीचे अध्यक्ष तथा पोलीस अधीक्षक विशाल आनंद, सदस्य तथा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक श्रीमती स्वाती काकडे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, प्रभारी पोलीस उपअधीक्षक (गृह) अभिजीत सोनवणे, तहसीलदार अतुल शेवाळे आणि लघु न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेचे सहाय्यक रासायनिक विश्लेषक अतुल पाटील यांच्या उपस्थितीत सर्व कागदपत्रांची पडताळणी व मोजणी करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनी शासकीय पंच हर्षल जोशी, वरिष्ठ लिपिक महेंद्र कापडे यांच्या उपस्थितीत याचा रीतसर पंचनामा केला.

पोलीस मुख्यालयात 'नशामुक्त भारत' सप्ताहाचा समारोप

भारताला व्यसनाधीनतेपासून मुक्त करण्यासाठी केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाद्वारे 'नशामुक्त भारत अभियान' राबवले जाते. या अभियानाचा भाग म्हणून १७ ते २३ जून २०२६ या कालावधीत जिल्ह्यात 'नशामुक्त भारत सप्ताह' साजरा करण्यात आला. आंतरराष्ट्रीय नशाविरोधी दिनाचे औचित्य साधून धुळे जिल्हा व्यसनमुक्ती केंद्र आणि जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने मादक द्रव्य दुरुपयोग व तस्करीविरुद्ध हा विशेष सप्ताह राबविण्यात आला.

आज धुळे पोलीस मुख्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात या सप्ताहाचा समारोप कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार होते, तर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश इंगळे व समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त देविदास नांदगावकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. या प्रसंगी मनोविकारतज्ज्ञ डॉ. सचिन लोहार यांनी उपस्थितांना व्यसनमुक्तीबाबत सखोल समुपदेशन केले. या कार्यक्रमास विलासराव करकड, शशिकांत भदाणे, आर. आर. पाटील, डॉ. संजय सिसोदे आणि शाहिर सुभाष कुलकर्णी यांची विशेष उपस्थिती होती. हा सप्ताह आणि समारोप कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धुळे जिल्हा व्यसनमुक्ती केंद्र व जिल्हा परिषदेच्या निशा पी. जाधव, नेहा कनवरसिंह जाधव, हर्षल पाटील आणि वर्षा गुंजाळ यांनी विशेष परिश्रम घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT