Dhule news 
धुळे

Dhule news | धुळ्यातील दोन दुकानात आढळला पाकिस्तान निर्मित सौंदर्य प्रसाधनांचा साठा

कॅन्सर सारख्या दूर्धर आजाराला निमंत्रण देणारी सौंदर्य प्रसाधनांची सर्रास विक्री

पुढारी वृत्तसेवा

धुळे : पाकिस्तानात तयार करण्यात आलेली तसेच भारतात प्रतिबंधित करण्यात आलेली सौंदर्यप्रसाधने धुळे शहरातील दोन दुकानांमध्ये आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. भारत सरकारने पाकिस्तानातून येणाऱ्या या वस्तूंच्या आयातीवर निर्बंध लावलेले असताना धुळ्यात अशा पद्धतीने पाकिस्तान निर्मित वस्तूंची विक्री करून देशाची फसवणूक केल्याचा प्रकार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक श्रीराम पवार यांच्या पथकाने उघडकीस आणली आहे. आता हा पाकिस्तान निर्मित सौंदर्यप्रसाधनाचा साठा नेमका कोठून आला, त्याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे.

भारत सरकारने पाकिस्तान मधून येणाऱ्या वस्तूंवर निर्बंध लावलेले असताना धुळ्यात सौंदर्यप्रसाधनांचा हा साठा असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळाली. त्यांनी ही माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर संबंधित दुकानांवर कारवाई करण्यासाठी स्वतंत्रपणे दोन पथक तयार करण्यात आले.

या पथकातील सपोनि नामदेव सहारे ,पोउनि चेतन मुंढे ,पोउनि अमित माळी तसेच पोलीस अंमलदार प्रशांत चौधरी, संदीप पाटील, पवन गवळी, राहुल सानप, संतोष हिरे, चेतन बोरसे, देवेंद्र ठाकुर, आरीफ पठाण, राहुल गिरी, कमलेश सुर्यवंशी, विनायक खैरनार व हर्षल चौधरी यांनी धुळे शहरातील जय शंकर मार्केट मधील श्री. साई ट्रेडर्स (प्रोप्रा. कैलास देवानंद नानकाणी) यांच्या दुकानात छापा टाकला.यात पाकिस्तान निर्मित सौंदर्य प्रसाधने मिळुन आली आहेत. या दुकानातून ग्रीन ब्युटी क्रीम, व्हाइटनिंग सोप, व्हाईटनिंग क्रीम, असा सुमारे 30 हजार रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे.

तसेच धुळे शहरातील नॅशनल हायस्कुलच्या मागे, सार्वजनिक मार्केट येथील बिग बाजार (प्रोप्रा. फजलू रहेमान मोहम्मद सलीम अन्सारी) यांचे दुकानात छापा टाकुन, पाकिस्तान निर्मित खालील सौंदर्य प्रसाधने मिळुन आली आहेत. या दुकानातून देखील सुमारे 31 हजार 411 रुपये किमतीची अशीच सौंदर्य प्रसाधने जप्त करण्यात आली.

या दोघा दुकानदारांकडे अशा प्रकारची सौंदर्य प्रसाधने विक्री करण्याचा कोणताही परवाना आढळून आला नाही त्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे विशेष म्हणजे ही सौंदर्य प्रसाधने या दुकानदारांनी मुंबई येथून घेतल्याचे प्राथमिक तपासात कळाले असले तरीही पाकिस्तानामध्ये तयार केलेली अशा प्रकारची सौंदर्य प्रसाधनांची तस्करी करणाऱ्या मुख्य तस्कराला शोधण्यासाठी आता धुळे पोलिसांनी कंबर कसली आहे.

कॅन्सरला निमंत्रण देणारी सौंदर्य प्रसाधने

पाकिस्तानात तयार करण्यात आलेल्या या सौंदर्यप्रसाधनाच्या माध्यमातून शरीरात वेगवेगळ्या प्रकारच्या कॅन्सरसारख्या दूर्धर आजाराला निमंत्रण मिळत असल्याचे यापूर्वी निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा प्रकारची सौंदर्य प्रसाधने प्रतिबंधित करण्यात आली आहे. विशेषता या सौंदर्यप्रसाधनांमुळे शरीराची रक्षण करणारी त्वचेचा पहिला स्तर हा नष्ट होतो .त्यामुळे सूर्याच्या अति नील किरणाचा सरळपणे शरीरावर परिणाम होत असल्याचे यापूर्वी निदर्शनात आल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे अशा प्रकारे मानवी जीवनाला घातक ठरणाऱ्या वस्तूंची तस्करी करणाऱ्या कुणालाही सोडले जाणार नसल्याची प्रतिक्रिया पोलीस प्रशासनाने व्यक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT