धुळे : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते तथा आमदार जयंत पाटील यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाचा धुळ्यात तीव्र निषेध करण्यात आला. शहर जिल्हाध्यक्ष रणजीत भोसले यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पडळकर यांच्या प्रतिमेला चपला मारून काळे फासले तसेच प्रतिकात्मक प्रतिमा जाळून संताप व्यक्त केला.
कार्यकर्त्यांनी आंदोलनादरम्यान घोषणाबाजी करत पडळकर यांच्या विधानाचा तीव्र शब्दांत निषेध केला. जयंत पाटील व त्यांच्या वडिलांविषयी केलेले उल्लेख निषेध नोंदविणारे असून अशोभनीय आहेत. पडळकर यांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाला काळीमा फासला गेला आहे. त्यांना वेळेत आवर घातला नाही तर धुळे जिल्ह्याच्या दौर्यावर आल्यानंतर त्यांच्या तोंडाला काळे फासू असा इशाराच यावेळी देण्यात आला.
राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी आमदारकी रद्द करण्याची व पडळकर यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनप्रसंगी रणजीत भोसले, जगन टाकते, भिका नेरकर, जितू पाटील, दीपक देवरे, मंगलदास वाघ, वाल्मीक मराठे, अशोक धुळकर, अमित शेख, भोला सैंदाणे, युसुफ शेख, रामेश्वर साबरे, राजू चौधरी, वैभव पाटील, गोलू नागमाल, मनोहर निकम, शेख हूजेर, डी. डी. पाटील, हेमंत पाटील, विश्वजीत देसले यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.