speech 
धुळे

Dhule News | पालकांनी मुला-मुलींना चांगले शिक्षण देण्यावर भर द्यावा : न्यायाधीश संदिप स्वामी

गणेश सोनवणे

धुळे : पुढारी वृत्तसेवा- घरकाम करत असतांना घरेलू कामगार महिलांना सामाजिक, आर्थिक, मानसिक, कौटुंबिक समस्यांना सामोरे जावे लागते. घरेलू कामगारांची परिस्थिती बदलायची असेल तर त्यांनी आपल्या मुला-मुलींच्या लग्नाची घाई न करता त्यांना चांगले शिक्षण द्यावे, जेणेकरून ते भविष्यात स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभे राहतील, असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधिश संदीप स्वामी यांनी केले.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व नवनिर्मिती संस्था, यांच्या संयुक्त विद्यमाने कामगार दिन व महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने एकदिवसीय कायदेविषयक शिबिराचे आयोजन समता नगर, साक्री रोड, धुळे येथे आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते.

न्यायाधीश संदीप स्वामी म्हणाले की, बालविवाह व बालमजुरी हे कायद्याने गुन्हा आहे, मुला- मुलींच्या शरीराची पूर्ण वाढ न होता त्यांचे कमी वयात लग्न केल्यास त्यांचे गंभीर परिणाम भोगावे लागतात. त्याचे विपरित परिणाम या मुलांच्या आयुष्यावर पर्यायाने कुटूंबावर होतात. त्यामुळे मुलांना चांगले शिक्षण देण्यावर भर देण्याचे आवाहन करुन त्यांनी यावेळी निर्भया केस, तसेच पोक्सो ॲक्ट व मनोधैर्य योजना तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत महिलांना मिळणारे मोफत विधी सहाय्य व सल्ला याबाबतही माहिती दिली.

अँड. भाग्यश्री वाघ यांनी "असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी कायदेविषयक सेवा व कामगारांच्या कायदेविषयक हक्काशी संबंधित इतर कोणतीही समस्या" या विषयावर मार्गदर्शन केले. नवनिर्मिती संस्थेचे अध्यक्ष शहाजी शिंदे यांनी "घरेलू कामगार महिलांच्या समस्या आणि उपाय योजना" यावर मार्गदर्शन केले. महिला व बाल विकास कार्यालय, धुळे येथील पर्यवेक्षा अधिकारी अर्चना पाटील यांनी "केंद्र व राज्य शासनाच्या योजना तसेच सार्वजनिक उपयोगिता" या विषयावर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे एम. बी. भट, सुरज शिरसाठ तसेच नवनिर्मिती संस्था, धुळेच्या महिला योगिता खेडवळ, मयुरी गवळी, शोभा लोंढे, सुरेखा पाटील, प्रतिभा शिंदे यांनी परिश्रम घेतले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार अँड. मोक्षा कोचर यांनी केले.

हेही वाचा –

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT