अंबादास बेनुस्कर
पिंपळनेर (साक्री) : तालुक्याला काल अवकाळी पावसासह जोरदार गारपिटीचा तडाखा बसला. गारपिटीमुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.प्राथमिक अंदाजानुसार गहू पिकाला सर्वाधिक फटका बसला असून शेतकरी संकटात सापडले आहेत.
अचानक कोसळलेल्या गारांच्या पावसामुळे काढणीस आलेली पिके अक्षरशःजमीनदोस्त झाली आहेत.गारांच्या माऱ्यामुळे शेतात उभा असलेला गहू आडवा झाला असून उत्पादनावर मोठा परिणाम होणार आहे. यासोबतच हरभरा व कांदा या पिकांनाही मोठा फटका बसल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे ही सर्व पिके काढणीच्या अंतिम टप्प्यात असल्याने शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. गारपिटीमुळे कांद्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
पंचनामा करून आर्थिक मदत जाहीर करण्याची केली मागणी
या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हवालदिल झाले असून तातडीने मदतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी शासनाकडे नुकसानग्रस्त क्षेत्रांचा तातडीने पंचनामा करून आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी केली आहे.
नांदवण परिसरात तासभर झाला वादळी पाऊस
तालुक्यातील नांदवण परिसराला अवकाळीचा मोठा तडका बसला.सुमारे तासभर झालेल्या पावसामुळे परिसरातील कांदा पिकाचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. परिसरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना या अवकाळी पावसाचा फटका बसला. शेतात साठवून ठेवलेला माल सुरक्षित ठेवण्यासाठी शेतकरी ताडपत्रीचा आधार घेत असून पावसापासून पीक वाचवण्यासाठी मोठी धडपड सुरू होती.
रब्बी हंगामातील पिके गहू, हरभरा पिकांचेही नुकसान
सध्या रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा या पिकांच्या काढणीचा हंगाम अंतिम टण्यात आहे. अनेक ठिकाणी ही पिके काढणीसाठी तयार आहेत, तर काही ठिकाणी मळणीची कामे सुरू आहेत. अशा स्थितीत आलेल्या पावसामुळे गहू व हरभरा काढणीला आलेली पिके भिजल्याने दाण्यांचा दर्जा खराब होण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण
हातातोंडाशी आलेला घास या अवकाळी पावसामुळे हिरावला जातो की काय, अशी भौती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. ढगाळ हवामान अजूनही कायम असल्याने काढणीला वेग आला असला तरी, पावसाच्या अनिश्चिततेमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. प्रशासनाने या नुकसानीचे त्वरित पंचनामे करावेत,अशी मागणी होत आहे.