धुळे : शहरात विविध विकासकामे वेगाने सुरू असून मुंबईच्या धर्तीवर धुळे शहरात आधुनिक ओपन स्पेस आणि उद्यानांची निर्मिती होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकसित भारताच्या संकल्पनेतून शहराला स्मार्ट, सुंदर, सुरक्षित आणि प्रगतिशील बनविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे राज्यशिष्टाचार व पणन मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले.
'सुलेखन गार्डन' आणि 'सरस्वती उद्यान' लोकार्पण सोहळ्यात पालकमंत्री रावल बोलत होते.यावेळी आमदार अनुप अग्रवाल महापौर मायादेवी परदेशी,माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, उपमहापौर ज्योत्स्ना पाटील, मनपा आयुक्त नितीन कापडणीस, सभापती लता सोनार, माजी महापौर जयश्री अहिरराव, प्रतिभा चौधरी यांच्यासह नगरसेवक, नागरिक उपस्थित होते.
पालकमंत्री रावल म्हणाले, धुळे शहरात आधुनिक उद्याने उभी राहिली आहेत. सहा महिन्यांच्या बालकापासून ते नव्वद वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येकाला आनंद देता येईल, अशी ही उद्याने आहेत. मुंबईप्रमाणे ओपन स्पेस डेव्हलपमेंट आता धुळ्यात साकारत असून शहराचा चेहरामोहरा झपाट्याने बदलत आहे. स्वच्छता, रस्ते, सुशोभीकरण आणि नागरिकांच्या सहभागामुळे धुळे आता इतर शहरांसाठी आदर्श ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.
धुळे शहरात सुमारे ५५ कोटी रुपयांच्या खर्चातून पाचकंदील मार्केटचे बांधकाम सुरू असून त्याचा भाजीपाला विक्रेते व व्यापाऱ्यांना मोठा लाभ होणार आहे. याशिवाय ४५ कोटी रुपयांचा जय हिंद मॉल (सिटी सेंटर), २६ कोटी रुपयांचा महिला मॉल, ३६ कोटी रुपयांचा दशहरा मैदान परिसरातील मॉल, तसेच संतोषी माता मंदिर ते विठ्ठल मंदिर, गणपती मंदिर ते स्वामी समर्थ मंदिर मार्गांचे सुशोभीकरण, रेल्वे स्थानक चौकाचे सौंदर्यीकरण आणि ५१ शक्तीपीठासाठी १५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
तसेच संतकृपा अपार्टमेंट परिसरातील विकासकामे, सरदार वल्लभभाई पटेल उद्यान, संत रोहिदास गार्डन, जवाहर स्टेडियममधील कुस्ती स्टेडियम, भारतरत्न गार्डन, पांझरा नदीकाठी चौपाटी आणि सर्व वयोगटांसाठी मल्टीपर्पज चिल्ड्रन्स गार्डन उभारण्याची कामेही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. धुळे शहरातील वीजवाहिन्या टप्प्याटप्प्याने भूमिगत करण्यात येणार असून त्यामुळे शहर अधिक सुटसुटीत आणि आकर्षक दिसेल, असेही त्यांनी नमूद केले.
तीन हजार नागरिकांनी 'एक पेड मा के नाम' या अभियानात सहभागी होऊन वृक्षारोपण करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. नगाव परिसरातील टेकड्यांवर ऑक्सिजन पार्क विकसित करण्यात येणार असून भविष्यात धुळे शहर अधिक हिरवेगार करण्याचा संकल्प करीत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. आमदार अग्रवाल यांनी सांगितले की, सहा महिन्यांत दोन्ही उद्याने पूर्ण करण्यात आली. या उद्यानांची देखभाल महापालिकेसोबतच नागरिकांनीही करावी, असे आवाहन त्यांनी केले. उद्याने सकाळी ६ ते ९ आणि सायंकाळी ५ ते रात्री १० या वेळेत नागरिकांसाठी खुली राहणार आहे.