धुळे : महिला बचतगटांमार्फत तयार केलेली वस्तू अंत्यत दर्जेदार असून या वस्तुंना कायमस्वरुपी बाजारपेठ उपलब्ध करुन होण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन आमदार मंजुळा गावित यांनी केले.
उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद, धुळे यांच्यातर्फे जिल्हास्तरीय स्वयंसिद्धा सरस वस्तु महोत्सव प्रदर्शन व विक्री महोत्सवाचे उद्घाटन शनिवार (दि.8) रोजी गरुड कॉम्प्लेक्स समोर, डायट कॉलेज साक्री रोड, धुळे येथे संपन्न झाले. यावेळी आमदार श्रीमती गावित बोलत होत्या. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश मोरे, महेश पाटील, जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय फडोळ, कार्यकारी अभियंता मुकेश ठाकुर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन बोडके आदी उपस्थित होते.
आमदार मंजुळा गावित म्हणाल्या की, महिला बचतगटांची उत्पादने दर्जेदार, चविष्ठ असतात. मात्र यांच्या विक्रीसाठी त्यांना खूप उपाययोजना कराव्या लागतात. यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून बचत गटांनी उत्पादीत केलेल्या वस्तुंची विक्री करण्यासाठी जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणी जागा उपलब्ध करुन देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे.
वन धन योजनेच्या माध्यमातून महिला बचत गटांनी अनेक छोटे मोठे उद्योग उभे करावेत. त्याच्यातून महिला भगिनींना चांगल्या पद्धतीने रोजगार उपलब्ध होऊ शकतो. महिला बचत गटांनी एकत्र येऊन भाडे पट्टयाने शेती घेऊन चांगलं उत्पादन घ्यावे. बाजारात विविध प्रकारच्या चटण्यांना मोठी मागणी असल्याने बचतगटांनी विविध प्रकारच्या चटणी तयार करुन विकाव्यात. तसेच काम करत असतांना महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. दर तीन चार महिन्यांनी आपल्या आरोग्याची नियमित तपासणी करावी. दररोजच्या आहारात नागलीचा समावेश करावा.
केंद्र व राज्य शासन महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक योजना राबवित आहे. बचत गटातील महिलांना शेत पिकाची फवारणीसाठी ड्रोन दिले जात आहे. मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना, गरोदर मातांसाठी पोषण आहार, प्रधानमंत्री आवास योजनेत घरकुल बांधण्यासाठी महिलांना प्राधान्य, संजय गाधी निराधार योजना अशा अनेक योजना राज्य शासन महिलांसाठी राबवित आहे. त्याचप्रमाणे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा अधिक महिलांना लाभ देण्यासाठी उत्पन्नाच्या अटींमध्ये सुद्धा शिथिलता आणण्याचा प्रस्ताव राज्य शासनाला दिला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
मुख्य कार्यकारी अधिकारी नरवाडे म्हणाले की, महिलांकडे बचतीचे कौशल्य असतं आणि त्याला ओळखून राज्य शासन महिलांच्या सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातंर्गत अनेक योजना राबविण्यात येत आहे. याचा महिला बचतगटांनी लाभ घ्यावा. मागील दोन महिन्यापूर्वी झालेल्या जिल्हास्तरीय मिनी सरस वस्तुच्या विक्री व प्रदर्शनात जवळपास 85 स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉलच्या माध्यमातून जवळपास 26 लाखांपर्यंत विक्री वेगवेगळ्या वस्तुंची झाली होती. शनिवार (दि.8) रोजी येथे जवळपास 75 स्टॉल लावण्यात आले आहे. या प्रदर्शनात मिलेट कुकीज, चटणी, लोकरीच्या वस्तू, ज्यूटच्या वस्तू, लाकडी वस्तू, दागिने, लेडीज बॅग, ड्रेस मटेरियल, साड्या,घरगुती मसाले, पापड, कुरडई आणि इतर खाद्यपदार्थ विक्रीचे स्टॉल लावण्यात आले आहे. या तीन दिवशीय सरस वस्तुंच्या प्रदर्शनास जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी भेट द्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते स्वंयसिद्धा जिल्हास्तरीय सरस वस्तुंचे विक्री व प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. पाणी व स्वच्छता क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या 8 महिलांचा सत्कार देखील करण्यात आला. यावेळी आमदार श्रीमती. गावित यांनी यावेळी विविध महिला बचत गटांनी लावलेल्या स्टॉलला भेट दिली.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा अभियान व्यवस्थापक (उमेद) उद्धव धारणे यांनी आभार मानले. जगदीश देवपूर यांनी सुत्रसंचलन केले. कार्यक्रमास मोठ्या संख्येन नागरिक, महिला बचतगटांचे प्रतिनिधी उपस्थित होते.