धुळे : धुळ्याच्या महापौर मायादेवी परदेशी यांच्या संदर्भात आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा वाद चिघळला आहे . या प्रकरणात गोरक्षक संजय शर्मा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना आज न्यायालयात हजर केले असता भारतीय जनता पार्टीच्या महिलांनी न्यायालयाच्या परिसरात घोषणाबाजी केली. दरम्यान संजय शर्मा यांच्या घरावर काल सायंकाळी उशिरा जमावाने हल्ला करून तोडफोड केली. या प्रकरणात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता. तर महिला महापौराचा अपमान करण्याचा निषेध तसेच अवैध धंदे नष्ट करण्याच्या मागणीसाठी उद्या रविवारी पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती आमदार अनुप अग्रवाल यांनी दिली आहे.
धुळ्यात गोरक्षण तसेच अवैध धंद्यांच्या प्रश्नावरून संवेदनशील वातावरण तयार झाले आहे. या विषयावरून गोरक्षक संजय शर्मा तसेच महापौर मायादेवी परदेशी यांचे सुपुत्र विकी परदेशी यांच्या समर्थकांमध्ये सोशल मीडिया वरून आरोप प्रत्यारोप सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर संजय शर्मा यांनी महापौर मायादेवी परदेशी यांच्या संदर्भात एक आक्षेपार्ह पोस्ट केली. त्यामुळे वातावरणात अधिकच तणाव वाढला. या कारणावरून संजय शर्मा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.
यानंतर सायंकाळी उशिरा आग्रा रोडवरील शर्मा यांच्या निवासस्थाना जवळील त्यांची दोन दुकाने तसेच घरामध्ये शिरून जमावाने मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली. या प्रश्नात देखील गुन्हा दाखल करावा, त्यामुळे शर्मा यांची पत्नी यांनी आझाद नगर पोलीस ठाण्यात रात्रभर ठाण मांडले. मात्र सकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नाही. त्यामुळे त्यांनी दुपारी थेट पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांची भेट घेऊन या सर्व प्रकाराची माहिती दिली. दरम्यान आज दुपारनंतर संजय शर्मा यांना चोख बंदोबस्तात न्यायालयात हजर करण्यात आले . यावेळी भारतीय जनता पार्टीच्या काही महिला कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. दरम्यान शर्मा यांची कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
तर शहरांमध्ये सोशल मीडिया वरून झालेल्या संदेशामुळे संवेदनशील वातावरण तयार झाले आहे. या पार्श्वभूमीवर तसेच महिला महापौरांचा चुकीचे शब्द वापरून अपमान करणे , या सर्व घटनांचा कायदा आणि सुव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे पोलीस प्रशासनाने याची तातडीने दखल घ्यावी, या प्रमुख मागणीसाठी रविवारी सकाळी दहा वाजेला मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती आमदार अनुप अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
धुळे शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून अवैध धंदे चालवले जात असल्याचे पुरावे असल्यास त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल, मात्र केवळ आरोप करून चालणार नाही, तर पुरावे दिले पाहिजे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. धुळे शहराच्या प्रथम नागरिक तसेच महापौर मायादेवी परदेशी यांच्या संदर्भात आक्षेपाहर्य पोस्ट करून त्यांचा अपमान केला जातो. तसेच काही लोक या पोस्टचे समर्थन करतात, विशेष म्हणजे यासाठी बनावट अकाउंट वापरले जाते. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तपास करावा व संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी देखील करण्यात आली. या सर्व मागण्यांसाठी रविवारी सकाळी 10 वाजेला चाळीसगाव रोड चौफुली वरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकापासून पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती आमदार अनुप अग्रवाल यांनी दिली आहे. यावेळी भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांच्यासह असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.