धुळे : नागपूर सुरत महामार्गावरून इंधन सदृश द्रव्याचा तस्करी करण्याचा प्रकार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने उघडकीस आणला आहे. या संदर्भात टाकलेल्या छाप्यात टँकर सह 23 लाख 86 हजार 840 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या संदर्भात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून डिझेलचा काळाबाजार करणाऱ्या मुख्य तस्करापर्यंत पोहोचण्याच्या हालचाली आता सुरू झाले आहेत.
नागपूर सुरत महामार्गावरून गुजरात राज्य मधून एका टँकर मधून इंधनाची तस्करी होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळाली. त्यामुळे त्यांनी ही माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर पोलीस पथकाने महामार्गावर सापळा लावून हा टँकर ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू केल्या. यावेळी फागणे शिवारामध्ये हा टँकर पोलीस पथकाने अडवला. चालकाकडून प्राथमिक माहिती घेण्यात आली. यात बिहार राज्यातील पटना जिल्ह्यातील पीपलावा पीपरावन येथील रहिवासी असणारा ट्रॅक्टर चालक विकास कुमार बबलु चौधरी याने गुजरात राज्यातून टँकर मध्ये डिझेल सदृश्य ज्वलनशिल रसायन भरुन सदर रसायन हे ज्वलनशील असल्याचे माहित असतांना ज्वलंनशिल रसायन हलगर्जीपणे हाताळून वाहतुक करतांना मिळून आला.
सदर रसायन आरोपी सुरत येथील जयदिप गिडा यांने राजकोट येथुन टँकर मध्ये भरुन ते मलकापूर येथील बापा सिताराम ट्रेडींग येथे घेवुन जाण्यास सांगितले. पण धुळे पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीमध्ये बापा सिताराम ट्रेडींग मलकापुर या नावाची फर्म नमुद पत्यावर अस्तित्वात नसतांना देखील या पत्यावर मे बापा सिताराम ट्रेडिंग नावाचे फर्म अस्तिवात असल्याचे भासुन तसे बनावट ई बील व टॅक्स ईन्व्हाईस तयार करुन त्याचा खरा म्हणुन वापर केल्याची बाब निदर्शनास आली.
वाहन धारकांना काळया बाजारात सदर डिझेल सद्रश्य पदार्थ विक्री करण्याचे उददेशाने व सदर द्रव्य पदार्थ ज्वलंनशिल आहे यांची जाणीव असतांना हलगर्जी व बेजबाब दार पणे वाहतुक करतांना मिळुन आला. त्यामुळे पोलीस पथकाने तातडीने हालचाली करीत टँकर सह चालकाला ताब्यात घेतले आहे. या संदर्भात टँकर चालक, सुरत येथील व्यापारी आणि मलकापूर येथील बनावट फर्म चालक विरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१८(४), २८७, २२३, ३३६(२), ३३६(३), ३४०, ३४०(२), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता धुळे पोलिसांनी या इंधनाची तस्करी मागे असणाऱ्या सूत्रधाराचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला आहे.