धुळे : अंमली पदार्थाच्या गुन्ह्यामध्ये अटक न करण्यासाठी दोन लाखांची लाच स्वीकारल्या प्रकरणात शिरपूर तालुक्यातील ठाणे पोलीस ठाण्यातील चौघा पोलीस कर्मचाऱ्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे .या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार हे शिरपूर तालुक्यातील मौजे महादेव दोंदवाडा, नागेश्वर पाडा येथील रहिवासी असुन त्यांच्या वडीलांविरुध्द थाळनेर पोलीस स्टेशन येथे अंमलीपदार्थ विरोधी अधिनियमान्वये गुन्हा दाखल आहे. थाळनेर पोलीस स्टेशनचे हवालदार भुषण रामोळे, पो.कॉ. धनराज मालचे, किरण सोनवणे व मुकेश पावरा यांनी तकारदार यांच्या वडीलांना गुन्हयात अटक न करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे ३ लाख रुपये लाचेची मागणी केल्याची तक्रारदार यांनी दुरध्वनीव्दारे माहिती दिली होती.
या माहितीवरुन धुळे ला.प्र. विभागाच्या पथकाने उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपुर तालुक्यातील बभळाज येथे जावुन तक्रारदार यांची तक्रार नोंदवून घेतली. या तक्रारीवरुन पडताळणी केली असता हवालदार भुषण रामोळे, पो.कॉ. धनराज मालचे, किरण सोनवणे व मुकेश पावरा यांनी तक्रारदार यांच्याकडे पंचांसमक्ष तडजोडीअंती २ लाख रुपये लाचेची मागणी करुन लाच स्विकारण्याचे मान्य केले होते, ही बाब स्पष्ट झाली त्यामुळे सापळा कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर सापळा कारवाई दरम्यान पो.कॉ. मुकेश पावरा यांनी तक्रारदार याच्याकडून २ लाख रुपये लाचेची रक्कम स्वतः स्विकारली असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.