धुळे : धुळ्यातील घाऊक फळ विक्रेत्यांची अन्न व औषध प्रशासनामार्फत तपासणी करण्यात आली. घाऊक फळ बाजारात कृत्रिमरित्या फळे पिकविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या रसायनांबाबत ही विशेष तपासणी मोहिम राबविण्यात आली.
या मोहिमेदरम्यान आंबा, केळी व टरबूज विक्रेत्यांची तपासणी करण्यात आली. तपासणीवेळी अन्न सुरक्षा व मानदे प्राधिकरणाद्वारे मान्यता नसलेल्या कार्बाइडसारख्या घातक रसायनांचा वापर करू नये, अशा सूचना विक्रेत्यांना देण्यात आल्या.
तसेच मे. जाहिद हाजी परी मोहम्मद फ्रुट मर्चंट, मुल्लवाडा, धुळे तसेच मे. निसार अँड ब्रदर्स, मुल्लवाडा, धुळे या घाऊक विक्रेत्यांकडून आंब्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त (अन्न) गोपाल माहोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी आनंद पवार व शशिकांत वाणी यांनी केली.