पिंपळनेर: (ता.साक्री)पुढारी वृत्तसेवा; तालुक्यातील चिंचपाडा येथील छाया किशोर गावीत यांचा प्रसुतीप्रसंगी डॉ. राहुल तावडे यांनी चुकीच्या पद्धतीने औषधोपचार केल्याने मृत्यू झाल्याने त्यांच्या परिवाराच्यावतीने डॉ. तायडे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पिंपळनेर पोलिस ठाण्याचे सपोनी श्रीकृष्ण पारधी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
पिंपळनेर शहरातील डॉ. राहूल तावडे हॉस्पीटल येथे 1 ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास चिंचपाडा(ता.साक्री) येथील छाया गावीत यांना दाखल करण्यात आले होते. त्या दरम्यान छाया गावीत यांचे सिझर झाल्यानंतर छाया गावीत यांची अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना डॉ.तावडे यांनी धुळे जिल्हा रुग्णालय येथे पाठविण्यात आले होते. तेथून सुरत येथे दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान छाया गावीत यांचा मृत्यू झाला असून त्यांच्या परिवाराकडून सांगण्यात आले की, डॉ. तावडे हे दारुच्या नशेत असल्याने त्यांनी चुकीचे औषधोपचार केल्यानेच त्यांचा मृत्यू झाला. याला जबाबदार डॉ. तावडे हेच असून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव अभियान धुळे यांच्यावतीने धुळे जिल्हाप्रमुख गणेश बळवंत गावीत यांनी सपोनी. श्रीकृष्ण पारधी यांच्याकडे तक्रार करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
यावेळी निवेदनावर पुष्पा गावीत, प्रेमचंद सोनवणे, मन्साराम भोये, गणेश गावीत आदींच्या सह्या आहेत. छाया गावित यांच्या मृत्यूची बातमी पिंपळनेरसह आदिवासी पश्चिम पट्ट्यात पसरल्याने आदिवासी समाजात डॉ. तावडे यांच्याविषयी रोष व्यक्त केला जात आहे. डाॅ.तावडे यांच्यावर गुन्हा दाखल न झाल्यास विविध आदिवासी संघटना न्याय मिळवून देतील अशी सर्वत्र चर्चा सुरू आहे. डॉ. तावडे यांच्याकडे यापूर्वीही सात ते आठ रुग्ण दगावल्याची पिंपळनेरसह परिसरात चर्चा आहे.
प्रसुती वेळी सदर महिलेला रक्तस्राव सुरू झाला. त्यांना उपचारास अडचणी येत होत्या. त्यामुळे त्या महिलेला धुळे जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. त्यावेळी महिलेची प्रकृती स्थिर होती. ती महिला माझ्या रुग्णालयात मरण पावली नाही.
डॉ.राहूल तावडे, पिंपळनेर
हेही वाचा :