धुळे : शिरपूर तालुक्यातील भाटपुरा गावात एका १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा विवाह होणार असल्याची माहिती चाईल्ड हेल्पलाइन 1098 वर मिळाल्यानंतर, जिल्हा प्रशासनाने तात्काळ कारवाई करत हा बालविवाह रोखण्यात यश मिळवले आहे. ही माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी राजेंद्र भामरे यांनी दिली.
चाईल्ड हेल्पलाइनच्या धुळे येथील सुपरवायझर महेंद्र चव्हाण व केसवर्कर संदीप पवार यांनी मिळालेल्या तक्रारीनुसार भाटपुरा गावातील संबंधित यंत्रणांना ग्रामसेवक, पोलिस पाटील, सरपंच, अंगणवाडी सेविका यांना तात्काळ सूचना दिल्या. याशिवाय डायल 112 वर संपर्क करून थाळनेर पोलीस ठाण्याच्या मदतीने कारवाई करत विवाहाची तयारी रोखली.
कारवाईदरम्यान ग्रामसेवक व स्थानिक प्रशासनाला काही प्रमाणात विरोध झाला. मात्र, पोलीस विभागाने बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 च्या अंतर्गत कठोर कारवाईचा इशारा दिल्यानंतर दोन्ही कुटुंबीय विवाह थांबविण्यास तयार झाले.
त्यानंतर कुटुंबीयांना बाल कल्याण समितीसमोर हजर करण्यात आले. समितीच्या अध्यक्षा डॉ. उषा साळुंखे, सदस्य प्रा. सुरेखा पाटील व अॅड. अनिता भांबरे यांनी बालविवाहाचे दुष्परिणाम समजावून सांगत समुपदेशन केले. यानंतर पालकांनी मुलगी १८ वर्षांची होईपर्यंत विवाह न करण्याचे लेखी आश्वासन दिले.
ही संपूर्ण कारवाई ग्रामसेवक एम.एस. पेंढारकर, पोलिस पाटील एकनाथ राठोड, सरपंच श्रावण चव्हाण, अंगणवाडी सेविका, तसेच चाईल्ड हेल्पलाइनचे कर्मचारी महेंद्र चव्हाण आणि संदीप पवार यांनी पार पाडली. यासाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी राजेंद्र भामरे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सतीश चव्हाण आणि चाईल्ड हेल्पलाइन प्रकल्प समन्वयक प्रतीक्षा मगर यांचे मार्गदर्शन लाभले.
जिल्ह्यात कुठेही बालविवाह होण्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी तात्काळ चाईल्ड हेल्पलाइन 1098 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. तक्रारदाराचे नाव व माहिती गोपनीय ठेवण्यात येते, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.