धुळे : धुळे जिल्हा राज्यातील औद्योगिकदृष्ट्या मागास मानला जातो. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या प्रस्तावित नवीन औद्योगिक धोरणात धुळे जिल्ह्याला 'ड प्लस' दर्जा द्यावा, जेणेकरून जिल्ह्यातील औद्योगिक विकासास चालना मिळेल, अशी ठाम मागणी आमदार अनुप अग्रवाल यांनी केली आहे. या मागणीसंदर्भात आमदार अग्रवाल यांनी मंगळवार (दि.10) रोजी उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी दोघांमध्ये धुळे जिल्ह्याच्या औद्योगिक भविष्याविषयी सविस्तर चर्चा झाली.
आमदार अग्रवाल यांनी सांगितले की, जळगाव, नाशिक व छत्रपती संभाजीनगर सारख्या शेजारील जिल्ह्यांमध्ये औद्योगिक वाढ वेगाने होत असताना धुळे मात्र कायमच उपेक्षित राहिला. परिणामी आजही धुळे जिल्हा औद्योगिकदृष्ट्या मागासलेला आहे.
अक्कलपाडा आणि सुलवाडे-जामफळ-कनोली प्रकल्पांमुळे पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे. सात राष्ट्रीय महामार्गांचे जाळे जिल्ह्यातून गेले आहे. धुळे-नरडाणा रेल्वेमार्गाचे काम प्रगतीपथावर दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर प्रकल्पात धुळ्याचा समावेश असून ही सर्व साधनसामग्री लक्षात घेता धुळे जिल्ह्याला 'ड प्लस' दर्जा दिल्यास, नरडाणा व धुळे औद्योगिक वसाहतींच्या विकासाला मोठी चालना मिळेल, असे आमदार अग्रवाल म्हणाले.
सध्याच्या अस्तित्वातील उद्योगांना कर व सवलतींचा लाभ द्यावा, इमर्जिंग व एक्स्प्लोरेशन श्रेणीत अतिरिक्त अनुदान देण्यात यावे, गुंतवणुकीला १२०% प्रोत्साहन देण्याचा विचार करावा SGST परतावा, व्याज सवलतीसारखे लाभ उपलब्ध करून द्यावेत, नवीन गुंतवणुकीसाठी स्वतंत्र प्रयत्न करण्यात यावेत अशा काही मागण्या यावेळी निवेदनाद्वारे मांडण्यात आल्या.
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आमदार अग्रवाल यांच्या मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत सांगितले की, धुळे जिल्ह्याला 'ड प्लस' दर्जा देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. तसेच या संदर्भातील सर्व बाबींवर गांभीर्याने विचार केला जाईल, असे आश्वासन त्यांनी आमदार अग्रवाल यांना यावेळी दिले.