धुळे

Dhule News : पिंपळनेर ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेत रुपांतर

गणेश सोनवणे

पिंपळनेर: (जि. धुळे)पुढारी वृत्तसेवा- 101 वर्षे जुनी पिंपळनेर ग्रामपंचायत आता नगरपरिषदेत रूपांतरीत होणार आहे. तसा शासकीय अध्यादेश प्रसिद्ध झाला आहे. आ. मंजुळा गावीत व शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ. तुळशीराम गावीत यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून पिंपळनेर वासियांना नगरपरिषदेचे गिफ्ट मिळाले आहे.

पिंपळनेर शहर झपाट्याने विकसित होत आहे. दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत असल्याने नागरी सुविधा पुरविताना पिंपळनेर ग्रामपंचायतीला मर्यादा यायच्या. परिणामी, पिंपळनेरच्या विकासासाठी नगरपरिषद होणे अत्यंत निकडीचे झाले होते. यासंदर्भात शासन दरबारी आ. मंजुळा गावीत, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉ. तुळशीराम गावीत यांचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते.

आ. मंजुळा गावीत व डॉ. गावीतांचा पुढाकार

साक्री तालुक्याच्या आ. मंजुळा गावीत व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉ. तुळशीराम गावीत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे पिंपळनेरला नगरपरिषद व्हावी अशी विनंती केली होती. तसा प्रस्ताव 27 सप्टेंबर 2021 रोजी मुख्यमंत्र्यांना भेटून देण्यात आला. प्रस्तावात ग्रामसभेचा ठराव, साक्री पंचायत समितीचा ठराव, जि.प.स्थायी समितीचा ठराव, भूमी अभिलेख साक्री यांचेकडून आवश्यक असलेला पिंपळनेरचा गाव नकाशा, नगर भूमापन हद्दीत येणारे सर्व्ह, गट नं.यांची माहिती, ग्रामपंचायतीची लोकसंख्या, नगरपरिषद स्थापना करण्यास आवश्यक असलेले ना हरकत प्रमाणपत्र, अकृषीक रोजगाराची टक्केवारी, जिल्हाधिकाऱ्यांचा अभिप्राय आदी कागदपत्रांची जुळवाजुळव केली. सदर प्रस्ताव 23 ऑगस्ट 2023 रोजी नाशिक विभागाचे आयुक्त यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना तर नगरविकास विभागाचे उपसचिव यांच्याकडेही समक्ष सादर केला. त्याची फलश्रुती म्हणून आज 101 वर्षे जुन्या पिंपळनेर ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपरिषदेत झाले आहे. यामुळे रस्ते,गटारी, लाईट,पिण्याचे पाणी,पूल आदी विकासकामे मार्गी लागणार आहेत

SCROLL FOR NEXT