धुळे : धुळे शहरात 15 कोटी रुपयांचे 50 खाटांचे आयुष हॉस्पिटल उभारण्यात येणार असून, यास सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री यांनी मंजुरी दिली आहे. खासदार डॉ. शोभा बच्छाव यांच्या मागणीनंतर ही योजना राष्ट्रीय आयुष अभियानांतर्गत धुळे शहरात मंजूर करण्यात आली आहे.
राज्य वार्षिक कृती आराखड्यात सन 2025–26 साठी किमान 10 आयुष हॉस्पिटल्स उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यात धुळे जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर खासदार बच्छाव यांनी संसद भवनात पाठपुरावा केला होता.
या निर्णयानुसार धुळे शहरातील श्री गणपती मंदिराजवळील 32 क्वार्टर्स परिसरातील जागेची पाहणी खासदार बच्छाव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्ता देगावकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सयाजी भामरे यांच्या उपस्थितीत करण्यात आली.
याप्रसंगी बोलताना खासदार डॉ. बच्छाव म्हणाल्या, "धुळे जिल्ह्यातील तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी यांसारख्या पारंपरिक उपचारपद्धती सहज उपलब्ध होतील. या प्रकल्पामुळे गुणवत्तापूर्ण आयुष सेवा सामान्य जनतेपर्यंत पोहोचणार आहे."
पाहणी दौऱ्यात महाविकास आघाडीचे पदाधिकारी व विविध पक्षांचे स्थानिक नेते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामध्ये युवराज करनकाळ, रमेश श्रीखंडे, पितांबर महाले, माजी विरोधी पक्षनेते हाजी साबीर शेठ, हाजी इस्माईल पठाण, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे रणजीत भोसले, डॉ. दरबारसिंग गिरासे, महिला जिल्हाध्यक्षा उषाताई पाटील, भिवसन अहिरे, सुनील शिंदे, डॉ. दिनेश बच्छाव यांचा समावेश होता.