सोनगीर: धुळे जिल्ह्यातील चिमठाणे परिसरात सार्वजनिक बांधकाम विभाग आणि कंत्राटदारांच्या 'अर्थपूर्ण' अभद्र युतीमुळे रस्ते विकासकामांचा अक्षरशः बोजवारा उडाला आहे. १६ कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या रस्त्यांची दोन वर्षांतच चाळण झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी आता थेट सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे धाव घेत आंदोलनाचा इशारा दिला आहे.
माजी सैनिक महेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात प्रशासकीय अनास्थेचा पाढाच वाचला आहे. चिमठाणे, सावळदे फाटा, शेवाळे फाटा, देहगाव, दुसाने-बळसाने आणि हेरगाव फाटा या मार्गांचे काम केवळ दोन वर्षांपूर्वी झाले होते. मात्र, निकृष्ट दर्जाच्या साहित्यामुळे सध्या या रस्त्यांवर गुडघाभर खड्डे पडले आहेत. रस्त्यावरील धुळीमुळे विद्यार्थी, वृद्ध आणि रुग्णांना श्वसनाचे गंभीर विकार जडले आहेत. पावसाळ्यात या खड्ड्यांमुळे चिखलाचे साम्राज्य निर्माण होऊन अपघातांची मालिका सुरू असते. वारंवार लेखी आणि तोंडी तक्रारी करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाने केवळ आश्वासनापलीकडे काहीही केलेले नाही.
रस्त्याची ही दुरावस्था होण्यास एस. बी. देशमुख आणि दीपक कोचर एन. बी. कंपनी जबाबदार असल्याचा थेट आरोप ग्रामस्थांनी केला आहे. संबंधित कंत्राटदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना कायमस्वरूपी 'ब्लॅकलिस्ट' (काळ्या यादीत) टाकण्याची मागणी जोर धरत आहे.
"१६ कोटींचा निधी नेमका मुरला कुठे? रस्ता आहे की खड्ड्यांचे जाळे, हेच समजेनासे झाले आहे. प्रशासनाने तातडीने डांबरीकरण न केल्यास आम्हाला रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करावे लागेल."— महेंद्र पाटील (माजी सैनिक व ग्रामस्थ)