सोनगीर : चिमठाणे चौफुलीवर पिंपरी गावालागत असलेल्या रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे ग्रामस्थानमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. 15 एप्रिल रोजी मोठ्या प्रमाणावर रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून या रस्त्याच्या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. सदर रस्त्याच्या कामासाठी अत्यंत निकृष्ट दर्जाचा सामग्री वापर करण्यात आल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे. त्यामुळे नागरिक व वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच रस्त्याची रुंदी ही कमी असल्याने वाहतुकीची कोंडी होत असल्याचे चित्र दिसत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित ठेकेदाराकडून या कामाकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. अनेक वेळा लेखी तक्रारी देऊनही केवळ आश्वासने दिली जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. यापूर्वी ही आंदोलन करण्यात आले होते मात्र त्यानंतरही परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही.
सामाजिक कार्यकर्ते व माजी सैनिक महेंद्र गोकुळ पाटील सोनू फौजी यांनी या प्रकरणात पुढाकार घेत वारंवार प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. तरीही अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याने नागरिकांचा संताप वाढत आहे.
दरम्यान संबंधित ठेकेदारांवर गुन्हा दाखल करून त्यांचे परवाणे रद्द करावेत तसेच कामाची सखोल चौकशी करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही निवेदन पाठवण्यात आले आहे. 15 एप्रिल पर्यंतचे रस्त्याचे काम योग्य पद्धतीने पूर्ण न झाल्यास चिमठाणे येथील नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असा इशाराही देण्यात आला आहे. आंदोलना दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील असेही नागरिकांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.