धुळे : धुळे महानगरपालिका प्रशासनाने शहरातील स्वच्छतेकडे केलेले दुर्लक्ष आणि ठेकेदारांकडून कचरा न उचलल्यामुळे संपूर्ण शहरात कचऱ्याचे ढिगारेच्या ढिगारे साचले आहेत. या परिस्थितीविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांच्यावतीने शुक्रवार (दि.24) रोजी तहसीलदार कार्यालयाच्या चौकात कचरा जाळून आंदोलन करण्यात आले. यावेळी “कचरा जलावो, आयुक्त हटावो” अशा घोषणा देत महापालिका प्रशासनाचा निषेध करण्यात आला.
शिवसेनेने इशारा दिला आहे की, येत्या दोन दिवसांत शहर परिसरातील कचरा न उचलल्यास महानगरपालिका मुख्य प्रवेशद्वाराजवळ ट्रॅक्टरभर कचरा टाकण्यात येईल.
गेल्या आठ दिवसांपासून धुळे शहरातील पेठ आणि कॉलनी परिसरात कचरा न उचलल्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. नागरिकांना यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या आठवड्यात स्थायी समितीच्या सभेत आयुक्तांनी नवीन ठेकेदार नेमण्याची घोषणा केली होती, परंतु सध्याच्या ठेकेदाराने काम बंद केल्याने परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे.
शहरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून, साथीचे आजार पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शुक्रवार (दि.24) रोजी मामलेदार कचेरी चौकात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी रस्त्याच्या मधोमध साचलेला कचरा जाळून महानगरपालिकेचे लक्ष वेधले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून आंदोलनाला जोरदार पाठिंबा दिला.
शिवसेना महानगर प्रमुख धीरज पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख भरत मोरे, आनंद जावडेकर, प्रशांत ठाकूर, शिवाजी शिरसाळे, कपिल लिंगायत, मुन्ना पठाण, संदीप चौधरी, डॉ. संजय पिंगळे, निलेश कांजरेकर, अमोल ठाकूर, इस्तियाक अन्सारी, चंद्रशेखर शिंदे, देविदास पाटील, तेजस सपकाळ आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.