धुळे : सध्या राज्यात सुरू असलेल्या 'प्रि मॅपिंग'च्या उपक्रमात मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार सुरू आहे. राज्यभरातील अनेक मतदारसंघांमध्ये हा प्रकार सुरू आहे. धुळ्यात देखील अशा प्रकारे मयत तसेच बोगस मतदारांचे प्री मॅपिंग करण्याचे काम सुरू आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असून असे काम करणाऱ्या विरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात आल्याची माहिती भाजपाचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या आणि धुळ्याचे आमदार अनुप अग्रवाल यांनी दिली आहे.
धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या मालेगावरोडवरील संपर्क कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत माजी खा. सोमय्या बोलत होते. या पत्रकार परिषदेला त्यांच्या सोबत आ. अनुप अग्रवाल, भाजप शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, माजीमंत्री डॉ. सुभाष भामरे, महापौर सौ. मायादेवी परदेशी, उपमहापौर सौ. ज्योत्स्ना पाटील, स्थायी समितीच्या सभापती सौ. लताबाई सोनार, नगरसेवक ओम खंडेलवाल, अॅड. रोहित चांदोडे आदी उपस्थित होते. धुळ्यासह राज्यात एसआयआरची प्रक्रिया सुरू आहे. त्या पार्श्वभुमिवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत किरीट सोमय्या म्हणाले की,धुळ्यासह राज्यातील ५० विधानसभा मतदार संघांमध्ये अल्पसंख्यांक मतदारांच्या संख्येमध्ये ५० टक्क्यांहुन अधिक वाढ झाली आहे. नैसर्गिक वाढीनुसार, मतदार संख्येतील वाढ २० टक्क्यांपर्यंत असायला हवी होती. ५० टक्क्यांहुन अधिक वाढ ही चिंतेची बाब असून मालेगावच्या २२ हजार मतदारांची धुळ्याच्या मतदार यादीत घुसखोरी असल्याचा गंभीर आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.
पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू मध्ये एसआयआरमुळे १० ते १५ टक्के बोगस मतदार बाहेर फेकले गेले. आपल्या राज्यात सुमारे ५० लाख बोगस मतदार हे मतदार यादीत आहेत. २८८ पैकी ५० विधानसभा मतदार संघांमध्ये अल्पसंख्यांक मतदारांची वाढ ही ५० टक्क्यांपेक्षा जास्त झाली आहे. हिंदू मतदारांची वाढ ही २० टक्के आहे. मोठ्या प्रमाणात वाढ ही चिंतेची बाब आहे. धुळ्यात ४० बुथची संशयास्पद यादी आमच्याकडे आहे. बीएलओ देखील अल्पसंख्यांक असल्याने गैरप्रकार झाले आहेत. २२ हजार मतदार हे धुळे आणि मालेगाव या दोन्ही ठिकाणच्या मतदार याद्यांमध्ये आहेत, असा आरोप यावेळी करण्यात आला.
यादीत बांग्लादेशी घुसखोर ; आमदार अग्रवाल
पत्रकार परिषदेत आमदार अनुप अग्रवाल म्हणाले की, एसआयआरच्य अनुषंगाने आम्ही दिल्लीत निवडणूक आयोगाची भेट घेतली. मॅपिंगमध्ये होत असल्याच्या फ्रॉडची माहिती दिली. राज्य निवडणूक आयोगालादेखील ही माहिती दिली आहे. आता जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेवून त्यांना देखील मॅपिंगमधील फ्रॉडची माहिती दिली आहे. अल्पसंख्यांक भागात प्रि मॅपिंगचे काम संशयास्पद आहे. मतदार यादीत एकच फोटो, पंरतू ईपीक आयडी वेगळे असे ३ हजार ५०० नावे आहेत. एसआयआर मॅपिंग रात्री २.३० ते ३ वाजता देखील झाले आहे. मालेगावचे मतदार धुळ्यात घालण्याचे उद्योग केले जात आहेत. फोटो एका व्यक्तीचा परंतू पत्ते वेगवेगळे आहेत.अशी ४ हजार ५०० नावे आहेत.
२००२ मधे धुळे विधानसभा मतदार संघाशी १४ खेडी संलग्न असतांना २ लाख ३३ हजार मतदार होते. त्यात १ लाख ५८ हजार हिंदू तर ४० हजार मुस्लिम होते. हिंदूंची संख्या २ लाख ६२ हजारावर तर मुस्लिमांची संख्या १ लाख १५ हजारावर गेली आहे. म्हणजेच दोनशे टक्क्यांपेक्षा जास्त मतदार वाढले आहे. बांगलादेशी घुसघोर धुळ्यात मोठ्या प्रमाणात असल्याचा संशय आ. अग्रवाल यांनी व्यक्त केला.