Bribery Case  Pudhari
धुळे

Dhule News | धुळ्यात कृषी साहित्य विक्रेत्याकडून लाच स्वीकारणाऱ्या कृषी पर्यवेक्षकास अटक

तक्रारदाराकडून २८ हजार रुपये स्वीकारताना पथकाने तेले याला रंगेहात बेड्या ठोकल्या

पुढारी वृत्तसेवा

धुळे : शेतकऱ्यांच्या ठिबक सिंचन अनुदानाचे प्रस्ताव मंजूर करून ते मंडळ कार्यालयाकडे पाठविण्याच्या मोबदल्यात २८ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या कृषी पर्यवेक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले. कैलास तेले असे या लाचखोर कृषी पर्यवेक्षकाचे नाव असून, या कारवाईमुळे कृषी विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

नेमके प्रकरण काय?

तक्रारदार यांचे नंदुरबार जिल्ह्यातील खांडबारा येथे ठिबक सिंचन साहित्य विक्रीचे दुकान असून त्याची एक शाखा धुळे तालुक्यातील शिरूड येथे आहे. परिसरातील शेतकरी या दुकानातून शासकीय अनुदान योजनेअंतर्गत ठिबक संचाची खरेदी करतात. या खरेदीनंतर महाडीबीटी पोर्टलवर अनुदानासाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन साहित्याची जोडणी झाल्याची खात्री करणे (मोका तपासणी) आणि त्यांच्या फाईल्स मंजुरीसाठी पुढील कार्यालयात पाठवणे, हे काम कृषी पर्यवेक्षक कैलास तेले याच्याकडे होते.

३५ हजारांची मागणी, १० हजार आधीच घेतले

हे शासकीय काम करण्यासाठी तेले याने तक्रारदार विक्रेत्याकडे ३५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यापैकी १० हजार रुपये त्याने यापूर्वीच स्वीकारले होते. मात्र, उर्वरित २५ हजार रुपयांसाठी त्याने तगादा लावल्याने विक्रेत्याने धुळे एसीबीचे उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्याकडे धाव घेऊन तक्रार नोंदवली.

अशी झाली कारवाई

एसीबीने तक्रारीची पडताळणी केली असता, तेले याने पुन्हा ३० हजार रुपयांची मागणी करून तडजोडीअंती २८ हजार रुपये घेण्याचे मान्य केले. त्यानुसार, धुळे शहरातील जय हिंद महाविद्यालय चौकात सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून २८ हजार रुपये स्वीकारताना पथकाने तेले याला रंगेहात बेड्या ठोकल्या.

कारवाई करणारे पथक

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे, पद्मावती कलाल आणि त्यांच्या पथकाने (राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, प्रविण मोरे, मकरंद पाटील, प्रविण पाटील, सागर शिर्के, प्रितेश चौधरी, चंद्रकांत सैंदाणे, रेश्मा परदेशी, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर) यशस्वी केली. याप्रकरणी आरोपी कैलास तेले याच्याविरुद्ध देवपूर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT