धुळे : धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहर हे दुहेरी हत्याकांडाने काल हादरले होते. या घटनेला एक दिवस उलटत नाही तोच आता साक्री तालुक्यात वर्धाने आणि उभरांडी शिवारात दोघांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या दोन्ही प्रकरणात तरुण आणि तरुणीची हत्या झाल्याचे प्रथमदर्शी निदर्शनास येत असून ही घटना भोंदूगिरीच्या कारणामुळे झाली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. या संदर्भात एका संशयित भोंदू बाबाला देखील ताब्यात घेण्यात आले आहेच.
साक्री तालुक्यातील भडगांव (वर्धाने) टेंभे फाट्याजवळ आज एका विवाहितेचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाच्या अंगावर एमएच १८ सी, एफ ८१५१ ही दुचाकी टाकण्यात आली होती तसेच मयत महिलेचे तोंड रुमालाने बांधलेले असल्याने हा घातपाताचा प्रकार असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी घटनास्थळाच्या प्राथमिक तपास केला असता मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारावर मृत महिलेचे नाव जयश्री रजनीकांत काकुस्ते (२५) असून ती कासारे गावातील रहिवासी असुन बचत गटांसाठी ती बजाज फायनान्समार्फत कलेक्शनचे काम करत होती. काल रात्री शेवटचा संपर्क तिने पतीशी केला. यावेळी दोघांमधे संभाषण झाले. त्यानंतर तिचा कुणाशीही संपर्क झाला नाही विशेष म्हणजे तिचा मोबाईल फोन बंद येत होता. त्यातच आज सकाळी तिचा मृतदेह थेट टेंभी फाट्याजवळ आढळल्याने एकच खळबळ उडाली.
जयश्रीच्या मृतदेहाजवळ तिची पर्स व मोबाईलही होता. त्यामुळे ही हत्या लुटीतून झालेली नसल्याचे उघड झाले आहे. या संदर्भात पोलीस प्रशासनाने तातडीने तपासाची चक्रे फिरवून जैताणे येथे राहणारा योगेश उर्फ भैय्या बापू खैरनार या संशयीताला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्यातून जयश्री बरोबरच आणखी एका दुसऱ्या तरुणाच्या मृत्यूची खळबळजनक माहिती पुढे आली. या मयत तरुणाचा मृतदेह जैताणे नजीकच्या उभरांडी शिवारात एका निर्जन ठिकाणी गौशाळा असणाऱ्या एका मठाजवळ टेकडीवर पुरल्याची माहिती यातून पुढे आली. त्यामुळे पोलीस पथक थेट या दुसऱ्या घटनास्थळावर पोहोचले येथून त्यांनी एका तरुणाचा मृतदेह हस्तगत केला त्याची देखील ओळख पटवण्यात आली हा तरुण भाडणे शिवारातील अक्षय सोनवणे (२८) याचा असल्याचे स्पष्ट झाले. यावेळी ताब्यात घेतलेल्या संशयिताने जयश्रीचा खून हा अक्षय सोनवणे करत होता. मात्र आपण बचाव करत असताना सोनवणे याची हत्या झाल्याची दिशाभूल करणारी माहिती त्याने पोलिसांना दिली.
या दोन्ही मृत्यूचा एकमेकांशी संबंध असल्याच्या दिशेने पोलिसांनी तपास केला असून याचा संबंध संशयित योगेश उर्फ भैय्या खैरनार याच्या समवेत असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेषता दोन्ही घटनास्थळाचा पोलिसांनी तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने कसून पंचनामा केला. श्वान शोध पथक, ठसे तज्ञ तसेच अन्य रासायनिक विश्लेषण करणाऱ्या यंत्रणांची देखील मदत घेण्यात आली. त्यामुळे हा दुहेरी खूनाचा प्रकार असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. मात्र तथाकथित भोंदू योगेश खैरनार याने अजूनही पोलिसांना दिशाभूल करणारी माहिती देणे सुरूच ठेवले आहे. विशेष म्हणजे हा भोंदू त्याच्या गोशाळा वजा मठात काही तांत्रिक विधी करत असल्याची बाब देखील परिसरातील चौकशीतून पुढे आली आहे. आज शनि अमावस्या असल्याने एखादा तांत्रिक विधी करण्याच्या कारणावरून हा प्रकार झाला असावा या दिशेने देखील पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मात्र मयत तरुण आणि तरुणी दोन्हीही वेगवेगळ्या गावातील असल्यामुळे पोलिसांसमोर देखील तपासाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.